• Mon. Nov 25th, 2024
    कार्यकर्ता हा सैनिक असतो, त्याचे लक्ष सेनापतीकडे असते, फडणवीस इंदापुरात काय म्हणाले?

    दीपक पडकर, इंदापूर : बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी भाजपच्या नेत्यांसह कार्यकर्ते अद्याप सक्रिय झाले नाहीत. याच पार्श्वभूमीवर ‘डॅमेज कंट्रोल’ करणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इंदापुरात शुक्रवारी सभा झाली. यावेळी महायुती एकत्रितपणे काम करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

    फडणवीस म्हणाले, महायुतीत आम्ही तीन प्रमुख पक्ष एकत्र आलो आहोत. इंदापुरात यापूर्वी राष्ट्रवादीसोबत आमची फाईट झाली. समोरासमोर आलो आहे. त्यामुळे काही बाबी होत्या. परंतु आता नेते व कार्यकर्ते एकत्रित काम करण्याच्या मानसिकतेत आले आहेत. कार्यकर्ता हा सैनिक असतो. सैनिकाचे लक्ष सेनापतीसाठी लढायचे हेच असते. सेनापतीचे काम हे सैनिकांना योग्य दिशा देण्याचे असते. सैनिकांनी आज जी भावना व्यक्त केली ती गैर नाही. पण आम्ही निश्चितपणे सैनिकांची समजूत घालू. हर्षवर्धन पाटील यांना विधानसभेच्या शब्दाबाबत ते म्हणाले, सगळ्यांना न्याय मिळेल अशी व्यवस्था आगामी काळात झालेली तुम्हाला पाहायला मिळेल.
    शिवतारे झाले, हर्षवर्धन राहिले; मिशन बारामतीसाठी फडणवीस सरसावले, इंदापुरात ‘पॅचअप’ सभा

    सोनाईचे प्रवीण माने यांच्या निवासस्थानी जात घेतलेल्या भेटीबाबत ते म्हणाले, प्रवीण भैय्या माने व माझे जुने संबंध आहेत. ते नेहमी माझ्या घरी येत असतात. इंदापूरला आल्यावर तुम्ही माझ्याकडे येत नाहीत अशी त्यांची तक्रार होती. त्यामुळे आज त्यांच्या घरी जात चहा घेतला. माने हे आमचेच आहेत. आत्ताही ते आमच्या सोबतच आहेत.
    पदरात काहीच न पडता शिवतारे झाले थंड; ज्यांच्यावर जहाल टीका केली आता त्यांचाच प्रचार करणार

    काँग्रेसने केलेल्या जाहिरात कॅम्पेनबद्दल ते म्हणाले, ज्याच्या स्वतःकडे नैतिक बळ असते. तोच दुसऱ्याला भ्रष्टाचारी ठरवू शकतो. काँग्रेसकडे असे नैतिक बळच नाही. त्यामुळे त्यांनी कितीही कॅम्पेन केले तरी तो केविलवाणा प्रयत्न ठरेल.

    काँग्रेसनं बाबासाहेबांना निवडून येऊ दिलं नाही, आता बाळासाहेबांना निवडून येऊ देणार नाही | फडणवीस

    दुष्काळी स्थितीमुळे मतदानावर बहिष्काराचा निर्णय काही गावे घेत आहेत, याबाबत ते म्हणाले, राज्य शासनाने दुष्काळी स्थितीबाबत योग्य नियोजन केले आहे. पिण्याचे पाणी प्रत्येक गावात पोहोचले पाहिजे याचा प्रयत्न केला जात आहे. पाण्याची गणिते जुळवून ठेवलेली असून पाणी राखून ठेवले आहे. निवडणुका असल्या तरी दुष्काळी स्थिती, पाणी याबाबत क्लोज मॉनेटरींग चालू आहे. लोकशाहीची प्रोसेस पाच वर्षातून एकदा येते. लोकशाहीतील ही संधी घालवणे चुकीचे ठरेल.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *