• Sat. Sep 21st, 2024
विशाल पाटलांना संसदेत पाठविण्याचं नियोजन करू, राऊतांनी ‘पुढचा प्लॅन’ सांगितला!

सांगली : सांगलीमधून शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील हे उमेदवार असून तेच या ठिकाणाहून निवडणूक लढतील. बाकी कोणीही मैत्रीपूर्ण लढतीची भाषा करू नये अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला ठणकावले.

काँग्रेस आणि शिवसेना उध्दव ठाकरे गट यांचा सांगलीच्या जागेवरून तिढा सुटत नसून, त्यात संजय राऊत आजपासून ३ दिवसीय सांगली दौऱ्यावर आहेत. तेथे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेवून निवडणूक प्रचार यंत्रणेचे नियोजन करत आहेत. यादरम्यान शुक्रवारी दुपारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

शिवसेना ठाकरे गटाने चंद्रहार पाटलांना सांगलीतून उमेदवारी जाहीर केली आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसने फार ताणू नये. त्यांनीही जुळवून घ्यावे. विशाल पाटील यांना संसदेत पाठविण्याचे नियोजन करू, त्यांना राज्यसभेत पाठवू, असे सांगतानाच कोणीही मैत्रीपूर्ण लढतीची भाषा करू नये, असा इशारा संजय राऊत यांनी सांगलीत जाऊन दिला.
सांगलीच्या जागेवरून मविआमध्ये ठिणगी; जागा लढण्याबाबत काँग्रेस ठाम, कार्यकर्ते राजीनामे देण्याच्या तयारीत

सांगली आमचीच, आम्हीच लढवणार

सांगलीची जागा ही कॉंग्रेसची पारंपारिक जागा असून आम्ही अजूनही या जागेवर ठाम असल्याची स्पष्ट भूमिका आमदार विश्वजीत कदम यांनी मांडली. आमदार विश्वजीत कदम हे सांगलीच्या जागेचा तिढा सोडवण्यासाठी दिल्लीला रवाना झाले आहेत.
सांगलीचा फायनल तोडगा काढण्यासाठी खासगी विमानाने विश्वजित कदम-विशाल पाटील दिल्लीत, सेना माघार घेणार?

दिल्लीत पक्षश्रेष्ठींना भावना कळवू, त्यानंतर निर्णय

सांगली ही जागा कॉंग्रेसची पारंरारिक जागा आहे. या बाबतीत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाने एकत्रितपणे निर्णय घेवून तो आम्हाला कळवावा. तसेच सांगलीची जागा ही कॉंग्रेस पक्षाने लढवावी ही सांगली जिल्ह्यातील तमाम कार्यकर्त्यांची इच्छा आहे तीच मागणी घेऊन मी आणि विशाल पाटील पदाधिकाऱ्यांसह दिल्लीला जात आहे. तिथे आम्ही आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि के. सी. वेणूगोपाल यांची भेट घेवून आम्ही आमचे म्हणणे त्यांच्या समोर मांडणार आहोत, असे विश्वजित कदम यांनी सांगितले.
ठाकरे गट पूर्ण ताकतीने शाहू महाराजांचा प्रचार करणार : अरुण दुधवडकर

आम्हाला हजेरीच्या सूचना नव्हत्या

संजय राऊतांच्या सांगली दौऱ्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, संजय राऊत यांचा दौरा त्यांच्या पक्षाच्या बैठकीसंदर्भात असून आम्हाला त्यांच्या बैठकीला उपस्थित राहण्याच्या कसल्याही सूचना नव्हत्या. आमच्या वरिष्ठांकडूनही त्यांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासंदर्भात अवगत करण्यात आलेले नव्हते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed