• Sat. Sep 21st, 2024
उष्णता नियंत्रण कृती आराखडा तयार, नागरिकांना काळजी घेण्याचे आयुक्तांचे आवहन

म. टा. प्रतिनिधी, ठाणे : वाढत्या उष्णतेचा धोका लक्षात घेता, ठाणे महापालिकेने ठाणे शहरातील उष्णता नियंत्रण कृती आराखडा तयार केला आहे. यासाठी स्थापन केलेल्या टास्क फोर्स कमिटीची पहिली बैठक पार पडली. यावेळी उष्णतेच्या लाटेबाबत काळजी घेताना नागरिकांनी काय करावे व काय करू नये, उष्णतेमुळे होणाऱ्या आजारांबाबत आशासेविका यांना प्रशिक्षण देऊन याबाबतची जनजागृती नागरिकांमध्ये करण्याचे निर्देश देत नागरिकांनी देखील काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले. त्यामुळे या उन्हाळ्याच्या अनुषंगाने पालिकेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.ठाणे शहराला खाडी किनारा लाभल्याने मार्च ते जूनपर्यंत वाढणाऱ्या आर्द्रतेमुळे उकाड्यात वाढ होते. साहजिकच नागरिकांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागतो. उष्णतेमुळे आरोग्याच्या तक्रारी वाढतात. त्यामुळे चक्कर येऊन पडणे, स्नायू अवघडणे, डोकेदुखी, श्वासाची व हृदयाच्या ठोक्यांची गती वाढणे, झटके येणे आदी त्रास जाणवतात. त्यामुळे नागरिकांना यावर काय उपाययोजना करायच्या याची माहिती देण्यात यावी. तसेच नजीकचे आरोग्य केंद्र आणि रुग्णालयांमध्ये याबाबत नोंद करण्याचे निर्देश पालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त १ संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त २ प्रशांत रोडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. चेतना नितिल, उपायुक्त अनघा कदम, मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान उपस्थित होते.

करोनामुळे आयुर्मानात १.६ वर्षांनी घट, आफ्रिकन देशांमध्ये मृत्यूदरात मोठी वाढ

उपाययोजनांबाबत माहिती

वाढत्या उष्णतेबाबत वागळे इस्टेट प्रभागात झोपडपट्ट्या व रहिवासी संकुलांमध्ये सामाजिक, आर्थिक, नैसर्गिक, भौगोलिक सर्वेक्षण करण्यात आले होते. या बैठकीत ‘सेंटर फॉर एन्व्हारमेंट एनर्जी ॲण्ड वॉटर’ या संस्थेने वागळे इस्टेट येथे केलेल्या सर्वेक्षणाबाबत, नागरिकांचे उषणतेच्या लाटेबाबतचे निरीक्षण व त्या अनुषंगाने करण्याच्या उपाययोजनांबाबत माहिती देण्यात आली. गेल्या काही वर्षांमध्ये उष्णतेच्या लाटेची तीव्रताही वाढत असून, रात्रीचे तापमानही वाढत आहे. त्याची झळ दैनंदिन कामकाज करताना समाजातील सर्व स्तरांना पोहोचत आहे.

आशा सेविकांकडून सर्वेक्षण

वागळे इस्टेट प्रभागामध्ये अंदाजे ४० टक्के लोकसंख्या ही १५ वर्षांच्या खाली आणि ६० वर्षांच्या वरील वयाची असून, त्यांच्यावर उष्णतेच्या लाटेचा परिणाम जास्त तीव्रतेने जाणवत आहे. नजीकच्या आरोग्य केंद्रामध्ये बहुतांश लोक उपचार घेतात. तसेच आशा सेविका घरोघरी नियमित पाहणी करतात. परिसरात ठिकठिकाणी पाणपोयांची संख्या वाढवणे, सार्वजनिक वाहतुकीची ठिकाणे जसे बस स्टॅण्ड, रिक्षा स्टॅण्ड या ठिकाणी सावली वाढवणे अशा उपाययोजना नागरिकांनी सुचवल्याचे या बैठकीत नमूद केले.

जनजगृतीचे निर्देश

उष्णतेमुळे होणाऱ्या आजारांबाबत रहिवासी संकुलांमध्ये माहिती पत्रके वाटणे, डिजिटल बोर्डवर सूचना प्रसिद्ध करणे, शैक्षणिक संस्थांमध्ये मुलांना वेळोवळी पाणी पिण्यासाठी सूचना देणे यांसारख्या बाबी समाविष्ट करणे, तसेच आशा सेविकेच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्याबाबतचे निर्देशही आयुक्त सौरभ राव यांनी बैठकीत संबंधितांना दिले. तसेच दर १५ दिवसांनी टास्क फोर्सची बैठक घेत, केलेल्या कामाचा आढावा घेण्याबाबतच्या सूचनाही यावेळी संबंधितांना देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed