राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने याआधी पहिल्या उमेदवारी यादीत पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा केलेली होती. बारामतीमधून सुप्रिया सुळे, शिरूरमधून अमोल कोल्हे, नगर दक्षिणमधून निलेश लंके, दिंडोरीमधून भास्करराव भगरे गुरूजी तर वर्ध्यातून अमर काळे यांना पक्षाने उमेदवारी दिलेली होती. गुरूवारी पक्षाने आणखी दोन उमेदवारांच्या नावाची घोषणा केलेली असली तरी सातारा आणि माढ्यामधून पक्षाने उमेदवार जाहीर केलेले नाहीत.
बजरंग सोनवणे यांना दुसऱ्यांदा उमेदवारी, बाळ्यामामांना तिकीट
अजित पवार गटातून काही दिवसांपूर्वीच बजरंग सोनवणे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला होता. प्रवेशानंतर राष्ट्रवादीने बीडमधून त्यांच्यावर विश्वास दाखवून त्यांना उमेदवारी दिलेली आहे. गत निवडणुकीत देखील प्रीतम मुंडे यांच्याविरोधात त्यांना उमेदवारी देण्यात आलेली होती. बीडमधून राष्ट्रवादीतून लढण्यास दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे इच्छुक होत्या. परंतु पक्षाने राजकीय गणिते डोळ्यासमोर ठेवून वेगळा विचार करून बप्पांना पुन्हा उमेदवारी दिली.
दुसरीकडे भिवंडीमधून लढण्यास काँग्रेस इच्छुक असताना राष्ट्रवादीकडे बाळ्यामामांसारखा तगडा उमेदवार असल्याने शरद पवार यांनी आग्रहाने जागा आपल्या पक्षाला मागून घेऊन तिथून मामांना लोकसभेच्या रिंगणात उतरवले आहे.
ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात खेचाखेची
महाविकास आघाडीमध्ये काही जागांवरून तिन्ही पक्षांत तिढा आहे तर काही जागांवर पक्षांना उमेदवार मिळत नाहीयेत. सांगली आणि उत्तर पश्चिम मुंबई या दोन जागांसाठी ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात खेचाखेची सुरू आहे. विशेष म्हणजे या दोन्ही ठिकाणी ठाकरे गटाने उमेदवार जाहीर केले आहेत.
माढ्यात पवारांचा उमेदवार कोण असणार?
धैर्यशील मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेशाचा निर्णय होत नसल्याने तसेच महादेव जानकर महायुतीमध्ये सहभागी झाल्यानंतर शरद पवार गटाचा माढ्याबाबतीत निर्णय होत नाहीये. दुसरीकडे संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांनी माढा मतदारसंघातून लढण्याची इच्छा व्यक्त केल्याची चर्चा आहे. शेकापचे डॉ. अनिकेत देशमुख यांनीही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
साताऱ्यात राष्ट्रवादीसमोर पर्याय काय?
सातारा मतदारसंघात राज्यसभेतील खासदार उदयनराजे भोसले आग्रही असले तरी भाजपने अद्याप त्यांचे नाव जाहीर केलेले नाही. खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रकृतीच्या कारणास्तव निवडणूक लढण्यास नकार दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासमोर कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील, माजी आमदार शशिकांत शिंदे, सत्यजित पाटणकर आणि सुनील माने हे पर्याय आहेत.
दुसरी उमेदवारी यादी जाहीर करताना पक्षाने काय म्हटलंय?
विजयाचा निर्धार पक्का करून ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ पक्षाच्या केंद्रीय संसदीय मंडळाने लोकसभा निवडणूक २०२४ ची दुसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. चला, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या साथीने ‘तुतारी’ला ललकारी देऊया, आणि दिल्लीच्या तख्ताला हादरवून सोडवूया..