उन्मेष पाटील आपल्या समर्थकांसह मातोश्रीवर पोहोचले. त्यानंतर मातोश्रीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उन्मेष पाटलांनी हाती शिवबंधन बांधून घेतले. यावेळी खासदार संजय राऊतही तिथे उपस्थित होते.
मी जात्यात आहे अनेकजण सुपात – उन्मेष पाटील
“ही लढाई पदाची जय-विजयाची नाही, ही लढाई आत्मसन्मानाची आहे. विकासाची लढाई आहे. तिथे आत्मसन्मान, संवाद होत नाही म्हणून अनेक कार्यकर्त्यांमध्ये खदखद आहे. आज मी जात्यात आहे, तर अनेकजण सुपात आहेत, त्यामुळे येणाऱ्या काळात सुपातील अनेकजण पुढे येतील”, असं उन्मेष पाटील यांनी पक्ष प्रवेशापूर्वी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
मी युतीचा खासदार, एका भावाने दगा दिला तरी दुसरा भाऊ माझ्यासोबत
महाराष्ट्राचा स्वाभिमान जागृत ठेवत एक मराठी बाणा ज्यांनी या भारतात एक आवाज पुढे नेत खऱ्या अर्थाने निष्ठावानांच्या देशाला जागृत आणि सज्जन शक्तीला ताकद देण्याचं काम केलेल्या शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंचे आभार. आज अनेकजण प्रश्न विचारत आहेत की उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराज झालात का, मी हे स्पष्ट करु इच्छितो, राजकारण करत असताना आमदार खासदार होणं हे कधीही साध्य नव्हतं. ते साधन म्हणून चांगलं काम करता येईल का या हेतूने काम करत होतो. दुर्दैवाने विकासाची तिथे किंमत नाही. मी युतीचा खासदार, एका भावाने दगा दिला तरी दुसरा भाऊ माझ्यासोबत, याचा मला आनंद आहे.
मला बदला घेण्यासाठी नाही तर बदल करण्यासाठी हे पद मिळालं या भावनेने मी काम केलं. पण, दुर्दैवाने हे बदल्याचं राजकारण रोज मनाला वेदना आणि त्रागा देणारं होतं. रिवेन्ज पॉलिटिक्स, पण मला, तरुणाईला आणि उत्तर महाराष्ट्राला हवंय चेन्ज पॉलिटिक्स, बदलाचं राजकारण हवंय.
काम करणारा एक कार्यकर्ता म्हणून प्रामाणिक प्रयत्न केला. ज्या पद्धतीने अवहेलना करण्यात आली, मला मान, सन्मान, पद नको. पण, ज्याप्रकारे कार्यकर्त्याची घुसमट होते, विकासाच्या जागी विनाशाची, बदलाऐवजी बदल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये रुजवली जाते, ते महाराष्ट्रासाठी अत्यंत घातक आहे, म्हणून आम्ही ठरवलं की आपण या पापाचे वाटेकरु होता कामा नये. जर तुमचा स्वाभिमान त्या ठिकाणी जपला जात नसेल तर पद नको. स्वाभिमान गहाण ठेवण्यापेक्षा स्वाभिमानाच्या लढाईत सामील होण्याचं आम्ही ठरवलं. आज मी आपल्याला विश्वास देतो, तुमच्या मार्गदर्शनात शिवसेनेचा जो स्वाभिमानी बाणा आहे, ज्या मशालीची क्रांतीची उत्तर महाराष्ट्रात नेऊ आणि तिथे शिवसेना रुजवू, मशाल क्रांतीचं प्रतिक म्हणून घेऊ.
उन्मेष पाटलांच्या जागी स्मिता वाघ यांना उमेदवारी
जळगाव लोकसभा मतदार संघातून यंदा विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांच्याऐवजी माजी आमदार स्मिता वाघ यांना भाजपाने उमेदवारी दिली. त्यामुळे उन्मेष पाटील हे नाराज होते. भाजपातील अंतर्गत गटबाजी व आमदार मंगेश चव्हाण यांच्याशी असलेला कलह यामागे कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर उन्मेष पाटलांनी संजय राऊतांची भेट घेतली आणि आज त्यांनी शिवसेना उबाठा गटात प्रवेश केला.