त्र्यंबकेश्वरचे अर्थकारण मंदिराभोवती फिरणारे आहे. येथे गर्दी कमी होताच त्याचे थेट परिणाम संपूर्ण शहराच्या अर्थकारणावर जाणवतात. पर्यटन वाढले तर त्यातून रोजगाराच्या संधी निर्माण होतील यासाठी केंद्र आणि राज्य शासन निधी देत आहे. येथे येणारे राजकीय नेते त्यासाठी नेहमीच तत्पर राहीले आहेत. मात्र, त्याचा फायदा येथील सर्व स्तरातील बेरोजगारांना होत नाही, हे वास्तव आहे. त्यामुळेच मंदिर आणि तेथील व्यवस्थेबाबत नेहमीच प्रश्न उपस्थित होतात.
माजी चेअरमन यांच्या शिस्तीची आठवण
त्र्यंबकेश्वरच्या शिवलिंगाची झीज होत असताना देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षांनी त्यासाठी उपाययोजना करण्यासाठी निर्देश आले आहेत. दरम्यान माजी चेअरमन न्या. विकास कुलकर्णी यांनी संस्थानला लावलेली शिस्त आणि भाविकांच्या सुविधेसाठी केलेली विकासकामे याबाबत आता प्रशंसा होत असून, आता अनेकदा दर्शनव्यवस्थेबाबत वाद होत असताना न्या. कुलकर्णींच्या शिस्तीची त्र्यंबककरांना आठवण येत आहे.
झीज कशी झाली?
त्र्यंबकराज मंदिराच्या गर्भगृहात जाण्यास बाहेरील भक्तांना मनाई आहे. त्यातही पंचामृतासारखे पूजा साहित्य मागच्या काही वर्षांपासून स्थानिक पुरोहित पिंडीवर वाहत नाहीत. मग शिवलिंगाची झीज झाली कशी? असा सवाल उपस्थित होत आहे. याबाबत शहरातील भक्तांमध्ये विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. व्हीआयपीच्या नावाखाली सोवळे परिधान करीत गर्भगृहात जाऊन दर्शन घेण्याचे, तसेच पाणी वाहण्याचे प्रमाण अलिकडे वाढले आहे. याप्रकारांना आळा घालण्याची मागणी होत आहे.
बाहेरच्या भक्तांना गर्भगृहात जाण्यास मनाई आहे, तर वज्रलेप झाल्यानंतर अल्पावधीत शिवलिंगाची झीज कशी झाली, याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे. याबाबत शासनाकडून वस्तुस्थिती तपासली जावी.-अमर सोनवणे, भाविक, त्र्यंबकेश्वर