• Mon. Nov 25th, 2024

    तुमचा मित्र लढतोय, तुम्हीही लढा, श्रीनिवास पाटलांना साताऱ्यातून लढण्यासाठी पक्षातून आग्रह

    तुमचा मित्र लढतोय, तुम्हीही लढा, श्रीनिवास पाटलांना साताऱ्यातून लढण्यासाठी पक्षातून आग्रह

    संतोष शिराळे, सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार हे खासदार श्रीनिवास पाटीलच असतील याच्यावर एक वाक्यता झाली असल्याचे सूत्रांकडून माहिती मिळत आहे. त्यामुळे साताऱ्याची जागा राष्ट्रवादीच लढवणार असून उमेदवार म्हणून श्रीनिवास पाटील यांच्या नावावर जवळजवळ शिक्कामोर्तब झाले आहे. वयाच्या ८४ व्या वर्षी शरद पवार खंबीरपणे पक्ष उभारणीसाठी मेहनत घेत असतील तर हा रांगडा सातारी पैलवान का मागे राहील? असाही एक मतप्रवाह समोर आला आहे. त्यामुळे श्रीनिवास पाटीलच सातारा लोकसभेचे उमेदवार राहतील, असे खात्रीशीर वृत्त आहे.

    ऐन निवडणुकीच्या काळामध्ये वयाच्या ८३ व्या वर्षी शरद पवार आक्रमकपणे राजकीय लढा देत असताना श्रीनिवास पाटील यांनी देखील मित्र म्हणून लढाईत शरद पवारांना साथ देण्याची पक्षातील एका गटाची भूमिका आहे. त्यासाठी हा गट त्यांचे मनपरिवर्तन करण्यासाठी कामाला लागला आहे. काल नुकताच कराड येथे इंडिया आघाडीचा मेळावा झाला. या मेळाव्यात उपस्थित राहून श्रीनिवास पाटील यांनी मार्गदर्शन केले. शरद पवार जो उमेदवार देतील. त्याचे आपण काम करू आणि त्याला विजयी करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. असे जरी असले तरी श्रीनिवास पाटील यांनी लग्न समारंभ, लोकसभा मतदारसंघांमध्ये अखंड दौरे सुरूच ठेवले आहेत. या वयातही त्यांनी गाठीभेटींवर जोर दिला आहे.
    श्रीनिवास पाटलांची निवडणुकीतून माघार; कार्यकर्ते म्हणतात, ‘राजेंविरुद्ध पवार साहेबांनी उतरावं’

    सध्या सातारा लोकसभा मतदारसंघातून तब्येतीच्या कारणास्तव निवडणूक लढणार नसल्याची श्रीनिवास पाटील यांची भूमिका राहिली असली तरी ते राजकारणातील चाणक्य शरद पवार यांचे खास मित्र आहेत आणि राजकीय जीवनामध्ये शरद पवार सांगतील तेव्हा पाटील सह्याद्रीसारखे कायम त्यांच्या पाठीशी राहिले आहेत. त्यामुळे शरद पवार यांचा हा हुकमी एक्का राखून ठेवला आहे, अशी चर्चा आहे. ही पॉलिटिक्स गेम असल्याचे बोलले जात आहे आणि श्रीनिवास पाटीलच हे सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राहतील, खात्रीशीर माहिती समोर येत आहे.
    साताऱ्यातून श्रीनिवास पाटलांची माघार, उदयनराजेंवर प्रश्न विचारताच शरद पवारांनी कॉलर उडवली

    पवार जे बोलतात त्याच्या विरुद्ध सर्वकाही घडतं!

    देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे राष्ट्रीय राजकारणातील मुरब्बी नेतृत्व… ते जे बोलतात त्याच्या विरुद्ध सर्वकाही घडत असते, असे नेहमी बोलले जाते. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघात मागील आठवड्यात शरद पवारांचा दौरा झाला. मात्र, या दौऱ्यामध्ये साताऱ्याचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा उमेदवार निश्चित होईल आणि त्याचं नावही जाहीर होईल, अशी आशा लागून राहिली होती. मात्र, घडलं भलतंच…! शरद पवारांचे तारुण्यापणापासून सहवासात असलेलेत्यांचे मित्र खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रकृतीच्या कारणास्तव लोकसभा लढविणार नसल्याचे जाहीर केले आणि एकच खळबळ उडाली. त्याला कारणही तसेच होते…

    पवारांच्या मनात हुकमी एक्का….

    गेल्या महिनाभरापासून श्रीनिवास पाटील यांना स्वपक्षीयातूनच मोठा विरोध होत गेला आणि तो विरोध त्यांच्या होम पीचवरचाच होता. जाहीर मेळाव्यातून त्यांच्या नावाला कोणी विरोध केला नसला तरी या मेळाव्यासाठी प्रसिद्ध केलेल्या फ्लेक्सवर त्यांचे फोटो नाव जाणीवपूर्वक टाळण्यात आले. असे असताना श्रीनिवास पाटील यांची मेळाव्यातील बॉडी लँग्वेज सर्वांना वेगळेच सांगून गेली. सदा हसतमुख असलेले पाटील मात्र यावेळी थोडे नाराजच दिसत होते. मात्र, यावेळी पाटील यांनी निवडणूक लढविण्यासाठी नकार दर्शवला असला तरी आठही विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी श्रीनिवास पाटील यांनाच पसंती दिली होती. त्यानंतर माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे, माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे पुत्र सत्यजित पाटणकर यांची क्रमाक्रमाने नावे पुढे येत होती.
    उदयनराजे साताऱ्यातून लढणार, राज्यसभेची जागा राष्ट्रवादीला देणार, भुजबळही लोकसभेच्या रिंगणात!

    सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या गोटात शुक्रवारपासून वेगवान हालचाली सुरू झाल्या. खासदार श्रीनिवास पाटील हे लढणार नसल्याचे काहीअंशी खरे असले तरी सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षच लढवणार हे निश्चित आहे. कार्यकर्त्यांच्या मनातून पुढे आलेल्या नावांवर जोरदार चर्चा सुरू झाल्या. या चर्चेतून खुद्द शरद पवार यांनी माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे आणि माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील या दोघांच्या नावावर पसंती दर्शवली.
    वळसेंच्या दुखण्याने आढळरावांना ‘इजा’, मित्राविना पराभवाचा ‘इजा-बिजा’ टाळण्यासाठी जोर गरजेचा

    शरद पवार जो उमेदवार देतील त्याचे आम्ही निष्ठेने काम करू आणि निवडून आणू, असा आत्मविश्वास त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला होता. सातारा लोकसभा मतदारसंघातील आठही विधानसभा मतदारसंघातील राजकीय अडाखे तपासून पाहिले, तर शशिकांत शिंदे आणि बाळासाहेब पाटील यांच्या नावावरच शिक्कामोर्तब होऊ शकते असे कयास काढण्यात आले. सातारा जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आलेला असताना मात्र शरद पवारांच्या डोक्यात, मनात त्यांचा हुकमी एक्काच घोळत आहे.
    गुंता काही सुटेना, लोकसभेसाठी महायुतीचे जागावाटप बनले कठीण, शिंदे-अजितदादांना किती जागा मिळणार?

    उदयनराजे भोसले विरुद्ध श्रीनिवास पाटील अशी फाईट!

    गेल्या दोन ते तीन दिवसांपासून या हुकमी एक्क्याची मनधरणी करण्यासाठी पवार साहेबांनी खास आदेश दिला आहे. हा आदेश दिला की भासवला जात आहे हे मात्र गुलदस्त्यातच आहे. कारण महायुतीचा उमेदवार अद्यापही जाहीर करण्यात आलेला नाही. या सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला गेला आहे. त्यामुळे या ठिकाणी उमेदवार कोण? हा सस्पेन्स कायम राहिलेला आहे. महायुतीमधील तिन्ही पक्षांकडून म्हणजेच भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाकडून हा मतदारसंघ भाजपलाच मिळावा यासाठीसुद्धा वरिष्ठ पातळीवर मोर्चेबांधणी सुरू आहे. अशातच दिल्लीहून परतलेले उदयनराजे भोसले यांनी “आरंभ हे प्रचंड” ही टॅगलाईन घेऊन शिरवळ ते राजधानी अशी ६० किलोमीटरची रॅली काढून शक्तीप्रदर्शन केले आहे. सातारा लोकसभा मतदारसंघाची खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे उमेदवार राहतील, अशी स्थिती आहे.

    त्यांच्या या रॅलीवर शरद पवार यांनी टिप्पणी केली नसली तरी उदयनराजे भोसलेच हे उमेदवार असणार हे पवार जाणून आहेत. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाकडून श्रीनिवास पाटील यांनाच निवडणूक लढण्यासाठी आग्रह करण्यात येत आहे. महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात श्रीनिवास पाटील हेच चांगला लढा देऊ शकतील, अशी पक्षातील वरिष्ठ नेत्यांसह पहिल्या फळीतील कार्यकर्त्यांची भूमिका राहिली आहे.

    पृथ्वीराज चव्हाण आणि जयंत पाटील यांच्यात चर्चा

    कराड येथे नुकतीच माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानी बंद दाराआड बैठक झाली. या बैठकीतून नाराज श्रीनिवास पाटील हे उमेदवार म्हणून उभे राहिल्यास कसे आपल्याला फलदायी ठरतील आणि महायुतीच्या उमेदवाराला कसे आव्हान देतील याची चर्चा या बैठकीत झाल्याचे बोलले जात आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed