• Sat. Sep 21st, 2024
ज्यांनी ज्यांनी मोदींना मदत केली त्यांनी त्यांचेच घर आणि पक्ष फोडला, मविआ खासदारांची टीका

धनाजी चव्हाण, परभणी: आज नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. ते पंतप्रधान झालेच नसते जर बाळासाहेबांनी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना गोदरा हत्याकांडात मोदींचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा घेण्यास रोखले नसते. पण नरेंद्र मोदी यांना ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांचेच घर आणि त्यांचाच पक्ष त्यांनी फोडला आहे. बाळासाहेबांनी मोदींना मदत केली आणि मोदींनी बाळासाहेबांची शिवसेना फोडली. तसेच कृषी मंत्री असताना शरद पवारांनी देखील नरेंद्र मोदी यांना गुजरातच्या विकास निधीसाठी मोठ्या प्रमाणावर मदत केली. पण मोदींनी पवारांचा पक्षही फोडला आणि घरही फोडले, अशी टीका संजय जाधव यांनी केली आहे.खासदार जाधव यांनी मंगळवारी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानिमित्ताने रॅलीनंतर घेतलेल्या सभेतून जाधव यांनी सत्तारुढ पक्षावर कडाडून हल्ला केला. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार फौजिया खान, माजी मंत्री तथा आमदार राजेश टोपे, ज्येष्ठ नेते आमदार सुरेश वरपुडकर, आमदार डॉ. राहुल पाटील, आमदार राजेश राठोड, आदी उपस्थित होते.
मी फक्त खुर्चीसाठी तुमच्यासोबत बसायचं, मला असं राजकारण नको, मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलंयाप्रसंगी खासदार जाधव म्हणाले, या मतदारसंघात सर्वसामान्य मतदारांनी शिवसेनेवर ठाकरे कुटुंबियांवर सातत्याने प्रेम केले आहे. प्रत्येक निवडणुकीत प्रचंड असे मताधिक्य दिले आहे. या निवडणुकीतसुध्दा सर्वसामान्य मतदार शिवसेनेवरील भरघोस असे प्रेम निश्‍चितपणे व्यक्त करेल, या निवडणूकीत धनुष्यबाण हे चिन्ह नाही, त्या गोष्टीची खूप खंत आहे. परंतु, मशाल हे चिन्हसुध्दा शिवसेनेला नवे नाही. छत्रपती संभाजीनगरातून मोरेश्‍वर सावे हे शिवसेनेचे पुरस्कृत उमेदवार हे केवळ मशाल या निवडणूक चिन्हावरच निवडून आले होते, असे नमूद केले.

सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी मशाल हे चिन्ह घरोघरी पोहोचवावे असे आवाहनही त्यांनी केले आहे. गेल्या दहा वर्षात आपण या मतदारसंघात सर्वसामान्य मतदारांच्या सेवेत होतो. सुख-दुःखात होतो. सदैव साथ दिली, असेही त्यांनी स्पष्ट केले. खासदार जाधव पुढे म्हणाले की, दहा वर्षांपैकी साडेसात वर्ष विरोधकांचे राज्य होते. त्यामुळे आपणास सवतीप्रमाणे वागणूक मिळाली. कामे झाली नाहीत. मात्र अडीच वर्षात ठाकरे सरकारने परभणीसाठी एक नव्हे, दोन वैद्यकीय महाविद्यालये बहाल केली. वैद्यकीय प्रवेशातील अन्यायकारक असा कोटा दूर केला. त्यामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना मोठ्या संख्येने मेडीकलसाठी प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला. परभणी शहरातील भूमीगत गटारे असो, अन्य विकास कामांनाही ठाकरे सरकारनेच मंजूरी बहाल केली आहे, असे सांगत जाधव यांनी आता देशात सत्तांतर करत परिवर्तनाची लाट आणूया, इंडिया गठबंधनाने वज्रमुठ बांधली आहे.

महायुतीत नाशिकच्या जागेवरून वरून पेच, भुजबळांची नरमाईची भूमिका?

सर्वसामान्य मतदारांचा आशीर्वाद हवा आहे. परभणी मतदारसंघात आपण आतापर्यंत मोदींच्या की बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर तरलो, हे या निवडणूकीच्या माध्यमातून दाखवून देवू, असे ते म्हणाले. भारतीय जनता पक्ष हा बेईमान असा पक्ष आहे. सातत्याने या पक्षाने भूलथापा मारल्या आहेत. निव्वळ घोषणाबाजी केली आहे. अलिकडे तर सरकारी यंत्रणांचा बेसुमार वापर करत पक्ष आणि घर फोडण्याचे काम या पक्षाने केले आहे. त्यामुळे भाजप विरुद्धचा रोष या निवडणुकीतून निश्‍चितपणे उमटेल, असा विश्वास जाधव यांनी व्यक्त केला. भारतीय जनता पार्टीच्या केंद्र आणि राज्य सरकारवर कडाडून टीका केली. या निवडणूकांमधून हे दोन्ही सरकारला मोठा धक्का बसेल, असा विश्वासही व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed