लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, मनोज जरांगे काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते; तसेच या निवडणुकीत मराठा समाजाचे उमेदवार देणार का, असा प्रश्नही उपस्थित होत होता. जरांगे यांनी शनिवारी अंतरवाली सराटी येथे भूमिका स्पष्ट केली. सर्व जिल्ह्यांतील सर्व गावांत जाऊन मराठा समाजाच्या बैठकीत लोकसभा निवडणूक लढवायची का आणि अपक्ष उमेदवार द्यायचा का, यावर चर्चा करण्यात आली. त्यातील समाजाचे मत घेऊन त्याचा अहवाल जरांगे यांनी २४ मार्च रोजी मागितली होता. त्या अहवालावर शनिवारी दिवसभर अंतरवाली सराटीच्या उपोषण मंडपात छाननी करण्यात आली. त्यानंतर जरांगे बोलत होते.
जरांगे म्हणाले, ‘सर्वांच्या अंगात राजकारण किती घुसले आहे, ते समजले. काही दिवसांत सर्वच जण उमेदवारीवर भाष्य करीत आहेत. मलाच उमेदवारी द्या, कोणाला देऊ नका, असे मत मांडत आहेत. मी कोणाला तिकिट द्यायला बसलेलो नाही.’
‘आपल्याला मराठा समाजाचे वाईट करायचे नाही. आपल्याकडे ३८ जिल्ह्यांचा भरपूर डेटा आहे; पण अहवाल लिहिणाऱ्या काही जणांनी एकत्र बसून अहवाल लिहिल्यासारखा दिसत आहे. त्यावर विश्वास ठेवला, तर मराठा समाजाचा पराभव झाल्याचे पाहावे लागेल. स्वार्थासाठी जात सोडायची नाही. ज्यांच्यावर मी विश्वास ठेवला, त्यांनीच मला सावध केले. आरक्षण रक्तात पाहिजे, राजकारण नको. या राजकारणासाठी जातीची माती होऊ देणार नाही,’ असे जरांगे म्हणाले.
‘विधानसभा महत्त्वाची’
‘लोकसभा निवडणुकीत आपले फार काही काम नाही; विधानसभा निवडणूक महत्त्वपूर्ण आहे,’ असे जरांगे म्हणाले. ‘मराठा समाजास आरक्षण दिले नाही, तर त्यांना विधानसभा निवडणुकीत पाहू. राज्यात ९३ मतदारसंघांवर मराठा समाजाचे एकहाती वर्चस्व आहे. जूनमध्ये नारायणगडावर सभा घ्यायची आहे,’ असे जरांगे यांनी जाहीर केले.
‘करेक्ट कार्यक्रम लावा’
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता जरांगे म्हणाले, ‘निवडणुकीत पाडणाऱ्याची सर्वांना खूप भीती असते. आपला करेक्ट कार्यक्रम करू म्हणणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम लावा. मी गावागावात जाणार असून, ही लोकसभेची निवडणूक मराठा समाजाच्या हातात आहे.’