लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच आज महाविकास आघाडीतील घटक पक्षात सातारा व सांगली लोकसभेच्या उमेदवारीबाबत कऱ्हाडमध्ये खलबते झाले. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. उभय नेत्यांमध्ये सुमारे एक तास बंद दाराआड चर्चा झाली. त्याची माहिती सांगण्यास आमदार जयंत पाटील यांनी नकार देत त्याबाबत नंतर बोलतो, असे म्हणत ते पुढील बैठकीला निघून गेले.
पृथ्वीराज चव्हाण व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट अत्यंत महत्वाची मानली जात आहे. सातारा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतल्याचे त्यांच्या निकटवर्तींयाकडून सांगण्यात आले. या बैठकीत सातारा लोकसभेची निवडणूक पृथ्वीराज चव्हाण यांनी लढवावी, अशी चर्चा झाली असल्याचे समजते. त्यामुळे सातारा लोकसभेच्या उमेदवारीचा तिढा सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सातारा लोकसभेची जागा महाविकास आघाडीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे असून, आता श्रीनिवास पाटील यांनी तब्येतीचं कारण देत लढणार नसल्याचे जाहीर केले आहे. साताऱ्यात विजय मिळवायचा असा निर्धार शरद पवारांनी केला आहे. त्यांच्यापुढे राष्ट्रवादीतील आ. शशिकांत शिंदे, आ. बाळासाहेब पाटील हे पर्याय आहेत. तरीही त्यांनी उमेदवारीसाठी माजी मुख्यमंत्री, आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा करत पसंती दर्शविली आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने शनिवारी पाच संभाव्य उमेदवारांची नावे जाहीर केली. मात्र, सातारा लोकसभा मतदारसंघातून प्रकृतीच्या कारणास्तव खा. श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. त्यामुळे शरद पवार यांनी त्यांचे नावे सध्या तरी बाजूला ठेवले आहे. श्रीनिवास पाटील हे शरद पवार यांच्या मनातील हुकमी अस्त्र आहेत. सध्या राष्ट्रवादीतून आ. शशिकांत शिंदे, आ. बाळासाहेब पाटील यांनी निवडणूक लढवावी, असा आग्रह आहे. मात्र, आ. बाळासाहेब पाटील, आ. शिंदे लोकसभा निवडणूक लढण्यासाठी सध्या तरी अंतर्मनाने तयार नाहीत.
भाजपकडून उदयनराजे रिंगणात
महायुतीतून सातारा लोकसभा मतदारसंघातून खा. उदयनराजे भोसले यांचे नाव निश्चित असल्याचे स्वतः उदयनराजे भोसले हे ठामपणे सांगत आहेत. पण ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला राहिल्यास आमदार मकरंद पाटील यांचे बंधू, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांचे तगडे आव्हान राहणार आहे. महायुतीत एकमत होऊन ही जागा भाजपला दिल्यास खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. १९९९ ला राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून येथे राष्ट्रवादीचाच खासदार विजयी झाला आहे. त्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघात कोणत्याही स्थितीत आपला उमेदवार विजयी करण्याचा खा. शरद पवार यांनी निर्धार केला आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न सुरू
साताऱ्यात नुकताच पवारांनी कार्यकर्ता मेळावा घेऊन प्रमुख कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. त्यात आ. शशिकांत शिंदे, आ. बाळासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हा बँकेचे संचालक सत्यजीत पाटणकर यांची नावे पुढे आली. मात्र, त्यातील सुनील माने, सत्यजीत पाटणकर यांच्या नावांना शरद पवारांचे प्राधान्य दिले नाही. आ. शिंदे यांनी लोकसभा निवडणूक लढवावी, अशी शरद पवारांची इच्छा आहे. त्यानंतर बाळासाहेब पाटलांबाबत ते विचार करू शकतील. मात्र, हे दोन्ही बडे नेते लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक नाहीत. त्यामुळे साताऱ्याच्या जागेवर विजय मिळवण्यासाठी योग्य उमेदवार म्हणून शरद पवारांनी पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
स्वच्छ प्रतिमा, विकासात्मक राजकारण असल्याने बाबांच्या नावावर शिक्कामोर्तब
सातारा जिल्ह्यातून काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री, आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणूक लढवावी, अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेसच्या मेळाव्यात एकमताने केली जात आहे. शिवाय, सर्वसामान्य, तळागाळापर्यंत पोहोचलेला हा नेत्याच्या उमेदवारीबाबत उत्सुकता आहे. त्यांची प्रतिमा स्वच्छ, विकासात्मक असल्याने त्याचा त्यांना निश्चित फायदा होऊ शकतो. त्यामुळे शरद पवार यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी देण्यासंदर्भात चर्चा सुरू केली आहे. त्यांनी दोन दिवसांपूर्वी पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी संपर्कही साधत त्यांच्याशीही चर्चा केली असल्याची माहिती आहे.
खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रकृती अस्वस्थ्याची कारणे समोर केली असली तरी ही अस्वस्थता ही ‘राजकीय’ असल्याची चर्चा आहे. तसे गेल्या महिनाभरात पाटण, कराड तालुक्यात झालेल्या मेळाव्यांच्या पोस्टरवरून कळून येत आहे. या पोस्टरवर खासदार श्रीनिवास पाटील यांच्या फोटोंना जागा दिलेली नाही. पाटील त्यांच्या उमेदवारीला कराड, पाटण तालुक्यातील बड्या नेत्यांनी विरोध केला आहे. तरीदेखील माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार शशिकांत शिंदे व आमदार बाळासाहेब पाटील यांनी सातारा लोकसभा मतदारसंघ लढण्यासाठी नकार दिल्यास ऐनवेळी शरद पवार यांना श्रीनिवास पाटील यांचा पत्ता खुला करावा लागेल आणि श्रीनिवास पाटील हाच शरद पवार यांचा हुकमी एक्का असेही बोलले जात आहे. याला एकमेव कारण म्हणजे महायुतीचा असलेला संभाव्य उमेदवार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले होय! त्यामुळे तोडीस तोड उमेदवार देण्याच्या हालचाली राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार करीत आहेत.