बुधवारी रात्री मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद हा सामना सुरू होता. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील हणमंतवाडी येथील मुंबई इंडियन्सचे समर्थक बळवंत झांजगे आणि सागर झांजगे हे इतरांसोबत गल्लीतील शिवाजी गायकवाड यांच्या घरात आयपीएलचा सामना पाहत होते. या सामन्यात हैदराबादने मुंबई इंडियन्ससमोर मोठा धावांचा डोंगर उभा केल्याने ते रागात होते. याच वेळी चेन्नई सुपर किंगचे समर्थक बंडोपंत तिबिले तिथे पोहोचले. काही वेळात रोहित शर्माची विकेट पडली. यावेळी बंडोपंत तिबिले रोहित शर्मा गेला. आता मुंबई इंडियन्सला सामना जिंकता येणार नाही, असे वक्तव्य करत चेन्नई सुपर किंग्जचे कौतुक ही करू लागले. यामुळे बळवंत झांजगे आणि सागर झांजगे यांना राग अनावर झाला. त्यांनी बळवंत झांजगे यांनी तिबिले यांच्या डोक्यात काठीने मारहाण केली.
तसेच सागरने डोक्यात फळी घातल्याने डोक्यातून रक्तस्त्राव होऊ लागले. यामुळे तिबिले जागीच बेशुद्ध पडले. येथील नागरिकांनी तिबिले यांना खासगी रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र काल शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तिबिले यांच्या पश्चात त्यांच्या मागे त्यांची पत्नी, मुलगा आणि तीन मुली असा परिवार आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली असून बंडोपंत तिबिले हे गावात सामाजिक कार्यात नेहमी पुढे असायचे. त्यांच्या अशा अकाली निधनाने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान या घटनेनंतर बळवंत तिबिले यांचे भाऊ संजय बापूसो तिबिले (४८) यांनी करवीर पोलिसात फिर्याद दिली होती. या घटनेचा घटनाक्रम आणि वादाचे कारण एकून पोलीस देखील चक्रावले होते. तर दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी बळवंत महादेव झांजगे (५०) आणि सागर सदाशिव झांजगे (३५) दोन्ही संशयितांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. गेल्या सतरा वर्षांपासून आयपीएल दिवसेंदिवस क्रिकेट प्रेमींच्या मनात घर केलं आहे. आयपीएलमध्ये संघाचे मालक कोट्यावधी रुपयाची इन्व्हेस्टमेंट खेळाडूंवर करतात. त्या पद्धतीने कोट्यवधी रुपयांचा नफा देखील त्यांना मिळतो. मात्र त्यांचे चाहते गल्लीबोळात एकमेकांशी भिडताना दिसत आहेत. जसं भारत पाकिस्तानची मॅच म्हटलं की हाय प्रोफाईल सामना होत असतो. त्या पद्धतीने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघ झाले आहेत.
दोन्ही संघाचे समर्थक एकमेकांकडे कट्टर विरोधक म्हणून पाहत विरोधी टीमवर तोंडसुख घेण्यात समाधान मानतात आणि यातूनच संघर्ष वाढत आहे. आयपीएल आले म्हटलं की सोशल मीडियावर या दोन्ही संघांचा रिल्स, स्टेटस, मिम्स चा महापूर दिसत असतो. तर गल्लीगल्लीत ज्या पोरांना क्रिकेट खेळता सुद्धा येत नाही असे कट्टर धोनी समर्थक , कट्टर रोहित शर्मा समर्थक म्हणत फिरत असतात. मात्र हेच संघर्ष एकमेकांवर जीवघेणे हल्ले करण्यापर्यंत पोहोचत आहे. मात्र याचा परिणाम खेळाडूंना आणि संघाच्या मालकांना काडीमात्र होत नाहीये ते कोट्यावधी रुपयाचा नफा मिळवण्यात व्यस्त आहेत आणि येथे त्यांचे समर्थक एकमेकांची डोकी फोडण्यात यामध्ये नुकसान होतं ते समर्थकांच्या मागे राहिलेल्या परिवाराच.