• Mon. Nov 25th, 2024
    Baramati Lok Sabha: कोण कोणावर पडणार भारी… बारामतीत पवार विरुद्ध पवार लढतीकडे देशाचे लक्ष

    बारामती (दीपक पडकर) – होणार.. नाही होणार… अशा चर्चा रंगत बारामतीची लढत आता पवार विरुद्ध पवार अशीच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात महायुतीकडून सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा आज करण्यात आली. महाविकास आघाडीकडून येथे विद्यमान खासदार सुप्रिया सुळे निवडणूक रिंगणात असतील. काका-पुतण्याच्या वर्चस्वाची ही लढाई असून कोण कोणावर भारी पडणार याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे.

    लोकसभा निवडणूकीत नेहमीच हा मतदारसंघ एकतर्फी राहिला आहे. त्यामुळे देशाच्या दृष्टीने बारामतीची लढाई कधी महत्त्वाची बनलीच नाही. बारामती जिंकायचीच असा चंग गेल्या काही वर्षात भाजपने बांधला होता. २०१४ साली त्यांनी महादेव जानकर यांना पुढे करत ताकद देत पवारांना जेरीस आणले. त्यावेळी जानकर यांचा निसटता पराभव झाला. त्यावेळच्या मोदी लाटेत जानकर यांनी कमळ हाती घेतले असते तर चित्र वेगळे दिसले असते, असे बोलले गेले. त्यानंतर २०१९ साली भाजपने कांचन कुल यांना उमेदवारी दिली. रसद पुरवली. परंतु पवारांच्या बलाढ्य किल्ल्याला त्या भगदाड पाडू शकल्या नाहीत.

    बारामती जिंकायची असेल तर पवार कुटुंबातच फूट पाडली पाहिजे हे हेरून भाजपने अजित पवार यांना आपल्याकडे वळवले. आता येथील निवडणूक रंगतदार होणार यात शंका उरलेली नाही. येथे सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी निवडणूक होत असली तरी प्रत्यक्षात ती शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीच होत आहे. एकीकडे अजित पवार यांचे मतदारसंघातील भक्कम नेटवर्क तर दुसरीकडे शरद पवार यांचे राजकीय डावपेच या निवडणूकीत काय घडवतील हे येणारा काळच ठरवेल.

    महायुतीसाठी हा मतदारसंघ त्या त्या विधानसभा क्षेत्रातील आमदारांमुळे सोपा वाटत आहे. परंतु मुरब्बी शरद पवार एवढ्या सहजासहजी कोणतीही गोष्ट होवू देत नसतात. हार ही तर त्यांच्यासाठी फार दूरची बाब आहे. १९६७ पासून बारामतीच्या मैदानावर पवार कुटुंबिय कधी हरलेले नाहीत. खुद्द शरद पवार यांनी एकाही निवडणूकीत पराभव पाहिलेला नाही. राजकीय मुत्सदेगिरी, डावपेचात ते तरबेज आहेत. त्यामुळे ते कोणता डाव टाकतात, याकडे लक्ष लागले आहे.

    मतदारसंघाचा विधानसभानिहाय आढावा घेतला तर बारामतीत खुद्द अजित पवार आमदार आहेत. इंदापूरला त्यांच्या विचारांचे दत्तात्रय भरणे, भाजप नेते हर्षवर्धन पाटील त्यांच्यासोबत आहेत. दौंडला आमदार राहूल कुल व राष्ट्रवादी अजित पवार यांच्यासोबत आहेत. पुरंदरचे आमदार काॅंग्रेसचे संजय जगताप व भोर वेल्ह्याचे आमदार संग्राम थोपटे हे सुप्रिया सुळे यांच्याबरोबर आहेत. तर खडकवासल्यात भाजपचे आमदार भीमराव तापकीर आमदार आहेत.

    कागदोपत्री महायुती भक्कम वाटत असली तरी अजित पवार यांच्या घरात खासदारकी गेली तर आपले पुढे काय ही चिंता अनेकांना सतावत आहे. त्यांचे गेली अनेक वर्षे जिल्ह्यावर वर्चस्व आहे. लोकसभेला मदत केली तरी विधानसभेला ते फसवतील अशी धास्ती हर्षवर्धन पाटील यांना आहे.

    शिवाय पुरंदरमधून माजी मंत्री विजय शिवतारे अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरणार होते. मात्र पक्षाच्या नेतृत्वाच्या मनोमिनानाला साथ देत निवडणुकीतून माघार घेत महायुती बरोबर ‘साथ साथ’ चालण्याचे ठरवले आहे. बारामती शहर व तालुक्यात अजित पवार यांचे मजबूत नेटवर्क आहे. बारामती व खडकवासल्यातील मताधिक्य वाढविण्याकडे त्यांचा कल असेल. तर नाराजीचा, बंडाळीचा शक्य तितका फायदा घेण्याचा प्रयत्न शरद पवार करतील. एकंदरीतच बारामतीच्या मैदानावरच दोघांचेही पुढील राजकीय भवितव्य अवलंबून असल्याने निकराची, अटीतटीची लढाई लढली जाईल.

    सुनेत्रा पवार यांचे कार्य काय…

    सुनेत्रा पवार यांची माहेरची पार्श्वभूमी राजकीय आहे. धाराशीवचे नेते पद्मसिंह पाटील यांच्या त्या भगिनी आहेत. विवाहानंतर त्या पवार घराण्याच्या सून म्हणून आल्या. बारामतीत एन्व्हाॅर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या माध्यमातून त्या गेली दहा वर्षांपासून कार्यरत आहेत. तत्पूर्वी त्यांनी काटेवाडी गावचा कायापालट केला. राष्ट्रपती पुरस्कार गावाला मिळवून दिला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेवर त्या कार्यरत आहेत. फोरमच्या माध्यमातून त्यांनी बारामती व दौंड तालुक्यात जलसंधारणाची भरीव कामे केली आहेत. याशिवाय दरवर्षी नेत्रतज्ज्ञ डाॅ. तात्याराव लहाने यांचे नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर त्या आयोजित करतात. या शिबिराचा आजवर हजारो रुग्णांना लाभ झाला आहे. त्या बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या चेअरमन आहेत. याशिवाय विद्या प्रतिष्ठान, ज्येष्ठ नागरिक संघ, महाराष्ट्र स्टेट अॅग्री अॅंड रुरल टुरुझम फेडरेशन आदींवर विश्वस्त म्हणून काम पाहतात. त्यांना आजवर मानाच्या विविध सहा पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed