पोलिसांनी सांगितले, की पवन मोरे शेतकरी असून, त्याचे पुढील आठवड्यात लग्न होते. लग्नकार्यासाठी बँकेतून पैसे काढून आणण्यासाठी पवन दुचाकीवरून निघाला होता. गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान दुचाकीवरून पिता-पुत्र जात असताना भरधाव वेगात बोलेरोने (क्रमांक एमएच २०, ईवाय ०६४५) पवनच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या धडकेमुळे पवन आणि त्याचे वडील रस्त्यावर खाली पडले. धडकेनंतर बोलेरो चालकाने पुन्हा पवनच्या अंगावरून जीप घातली. पवनच्या डोक्यावरून जीप घातल्यानंतर मारेकऱ्यांनी पवनचे वडील शिवराम मोरे यांच्याही अंगावर जीप घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, पायावरून जीप गेल्याने ते जखमी झाले.
पवनला बेशुद्धावस्थेत घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, डॉक्टरांनी पवन याला मृत घोषित केले. पवनचे वडील शिवराम मोरे यांना उपचारासाठी ‘घाटी’मध्ये दाखल करण्यात आले आहे.
पवनच्या अंगावर घालण्यात आलेल्या गाडीत संशयित सचिन भागचंद वाकचौरे (रा. धूपखेडा ता. पैठण) व इतर पाच जण असल्याचा दावा पवनच्या नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी शिवराम मोरे यांच्या फिर्यादीवरून सहा जणांविरुद्ध वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र सहाने करीत आहेत.
गाडी सोडून दुचाकीवरून पलायन
पवन मोरे याच्या अंगावर गाडी घातल्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात मारेकऱ्यांची गाडी खड्ड्यात जाऊन अडकली. ती बाहेर काढण्याचा प्रयत्न गाडीतील व्यक्तींनी केला. मात्र, गर्दी जमा होऊ लागल्याने पवनचे मारेकरी दुचाकीवरून पळून गेले, असे पोलिसांनी सांगितले.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
प्रेमप्रकरणातून खून?
पवन याच्या मामाचा मुलगा विशाल नवले याने सचिन व विशाल वाघचौरे यांच्या बहिणीशी पळून जाऊन प्रेमविवाह केला. या दोघांचा विवाह नोंदणी पद्धतीने झाला. या लग्नात वाघचौरे आणि नवले कुटुंबाचे नातेवाईक होते. वाघचौरे यांच्या बहिणीला पळवून नेण्यात आणि प्रेमविवाहात पवन मोरे याने सहकार्य केल्याचा संशय सचिन वाघचौरे आणि त्याच्या भावाला होता. या रागातून सचिन व त्याच्या साथीदारांनी पवनचा खून केला, असा दावा नातेवाइकांनी केला.