कोकणातून जाणारा ग्रीन फील्ड हा कोकण एक्सप्रेस वे व सागरी महामार्ग यांची सांगड घालून ही नवीन ग्रोथ सेंटर निश्चित करण्यात आले आहेत. यासाठी जमीन अधिग्रहण आदी काही तांत्रिक प्रक्रिया सद्यस्थितीत सुरू आहेत. यामुळे कोकणातील ग्रामीण भागालाही महत्त्व येणार आहे. कोकणातील संबंधित ग्रामीण भाग पर्यटन उद्योग विकासाच्या टप्प्यात यावा, नवीन रोजगार निर्माण व्हावेत, यासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी कोकण विभागातील पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील कोकण द्रुतगती महामार्ग/ कोकण किनार पट्टी महामार्ग इंटरचेज / लगत एकूण १३ नवनगरे / ग्रोथ सेंटरच्या एकूण ४४९.८३ चौरस किमी क्षेत्राकरीता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्याची विनंती सरकारला १२ मार्च २०२४ रोजीच्या पत्रान्वये केली आहे. यामध्ये अधिसूचित क्षेत्रामधील १०५ महसुली गावांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची या क्षेत्रासाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केली आहे. सिंधुदुर्ग रायगड पालघर या जिल्ह्यातील एकूण ४४९.८३ चौरस किलोमीटर करीता ही अधिसूचना लागू करण्यात आली आहे.
सर्वाधिकारी नगर विकास खात्याकडे
महामार्गालगतच्या गावांमध्ये पर्यटन उद्योगाला चालना मिळावी आणि स्थानिकांना रोजगार मिळावा, यासाठी विकास आराखडा तयार करण्याचे काम ‘एमएसआरडीसी’ने हाती घेतले आहे. मात्र या परिसरातील बिनशेती दाखले किंवा नियोजन विकासाचे सर्वाधिकार हे स्थानिक पातळीवर संबंधित नगर विकास खात्याकडेच अबाधित राहतील, अशी माहिती ‘एमएसआरडीसी’च्या उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.
