• Mon. Nov 25th, 2024

    नाथाभाऊंचा उल्लेख, महाजनांचं नाव का घेत नाही? रक्षा खडसेंना कार्यकर्त्यांचा सवाल, बैठकीत वाद

    नाथाभाऊंचा उल्लेख, महाजनांचं नाव का घेत नाही? रक्षा खडसेंना कार्यकर्त्यांचा सवाल, बैठकीत वाद

    – निलेश पाटील

    जळगाव: जळगाव जिल्हा भाजपमधील अंतर्गत धुसफूस समोर आली आहे. भाजपच्या अंतर्गत बैठकीत मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोरच खासदार रक्षा खडसे आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. या वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे जळगाव भाजपमध्ये सारं काही आलबेल नसल्याचं चित्र समोर आलं आहे.

    जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक दिनांक १९ मार्च रोजी ब्राह्मण सभागृहात पार पडली. वरणगाव येथील काही पदाधिकारी व कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते. त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे खासदार रक्षा खडसे यांच्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. यावर मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांना कार्यालयात येण्यास सांगितले. त्या ठिकाणी कार्यकर्ते गेल्यावर पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये गुप्त बैठक सुरू होती. मात्र या बैठकीत वाद झाला होता.
    राणांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; भाजपचा प्लान बी तयार, उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात?
    बैठकीतील खडाजंगीचे व्हिडिओ सोशल मीडियाद्वारे व्हायरल झाल्याने भाजपाचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. या व्हिडिओत मंत्री गिरीश महाजन आमदार राजू मामा भोळे, आमदार मंगेश चव्हाण, जळगाव लोकसभेच्या उमेदवार स्मिता वाघ तसेच खासदार रक्षा खडसे दिसत आहे. यात वरणगाव येथील माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी थेट रक्षा खडसे यांच्यावर आरोप केले. खडसे आमच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे त्यांनी महाजन यांच्यासमोर सांगितले.

    रक्षा खडसे त्यांचे सासरे एकनाथ खडसे यांचे नाव वारंवार घेतात. मात्र मंत्री गिरीश महाजन यांचे नाव का घेत नाहीत, असा थेट सवाल पदाधिकाऱ्यांनी रक्षा खडसेंना विचारला. यावर रक्षा खडसे यांनी सांगितले की मी नाथाभाऊंचे नाव घेतेच. मात्र गिरीश भाऊंचे नाव देखील मी माझ्या प्रत्येक भाषणामध्ये घेत असते. यावर तुम्ही काही आरोप लावू नका.
    श्रीकांत शिंदेंविरोधात तगडा उमेदवार मिळेना; ठाकरेंकडून कल्याणसाठी काँग्रेस नेत्याला ऑफर?
    रक्षा खडसे या वारंवार भाजपाच्या कार्यकर्त्यांना डावलत असतात. त्या नेहमी भाजपाच्या कार्यकर्त्यांना सोडून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन फिरत असतात, असाही आक्षेप भाजप पदाधिकाऱ्यांनी नोंदवला. हा आरोप रक्षा खडसेंनी फेटाळून लावला. यावरुन पदाधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले.

    रक्षा खडसे यांना उमेदवारी दिल्याने आधीच रावेर, बोदवड, वरणगाव, यावल, चोपडा, जामनेर या भागातील पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज आहेत.
    त्यातच आता अंतर्गत बैठकीतील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने रक्षा खडसेंच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे येणारी निवडणूक रक्षा खडसे यांना जड जाण्याची शक्यता आहे. गुप्त बैठकीतील व्हिडिओ तब्बल सहा दिवसानंतर आज सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने भाजपवर मोठा नामुष्की ओढवली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *