आयआयटी आणि मध्य रेल्वेच्या संरचनात्मक तपासणीत शीव रेल्वे उड्डाणपूल धोकादायक ठरवण्यात आला होता. पुलावरील वाहतूक बंद करून त्याची पुनर्बांधणी करण्याची शिफारस अहवालात करण्यात आली आहे. यापूर्वी २० जानेवारी, २८ फेब्रुवारी आणि २२ मार्च अशा तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र विविध कारणांमुळे पुलाचे पाडकाम पुढे ढकलण्यात आले होते. आता पूल बुधवारपासून बंद होईल, अशी घोषणा करण्यात आली आहे. हा पूल वाहतुकीसाठी बंद केल्यावर पाडकामासाठी सहा महिने आणि पुनर्बांधणीसाठी दीड वर्ष लागणार आहे. याच दरम्यान सीएसएमटी-कुर्ला दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकांचे कामही करण्यात येणार आहे, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी सांगितले.
पूल बंद केल्यानंतर सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड आणि पूर्व द्रुतगती मार्गाला जोडणारा एलबीएस रोड तसेच, धारावीकडे जाणारा मार्ग असे दोन पर्यायी मार्ग वाहनचालकांसाठी उपलब्ध राहणार आहेत. बेस्ट बस मार्गांवरही बदल करण्यात आले आहेत. चालकांची गैरसोय होऊ नये यासाठी हे बदल करण्यात आले असून तसे दिशादर्शक फलक उभारण्यात आले आहेत, असे वाहतूक पोलिसांनी सांगितले.
४९ कोटींचा खर्च
मध्य रेल्वेने महानगरपालिकेच्या समन्वयाने शीव रेल्वे स्थानकातील रोड ओव्हर पुलाची पुनर्बांधणी व नवीन रस्ता बांधण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन रोड ओव्हर पूल बांधणीसाठी मध्य रेल्वे २३ कोटी रुपये तर, नवीन रस्ता बांधण्यासाठी मुंबई महापालिका २६ कोटी रुपये खर्च करणार आहे.
लांबी वाढणार
शीव रेल्वे स्थानकावरील उड्डाणपूल सध्या ४० मीटर लांब आहे. तो ५१ मीटरपर्यंत वाढवण्यात येणार आहे. हा पूल दोन स्पॅनवर असून त्याचा एक खांब रेल्वे मार्गावर आहे. नवीन पूल एकाच स्पॅनवर असणार आहे. यामुळे अतिरिक्त रेल्वे मार्गिका उभारण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होणार आहे.
बेस्ट बसच्या मार्गांत बदल
– ११ मर्यादित – कलानगर मार्गे – टी जंक्शन व सुलोचना शेट्टी मार्गाने- सायन रुग्णालय – नेव्हीनगर रवाना
– १८१, २५५ म. ३४८ म. ३५५ म. – कलानगर- टी जंक्शन व सुलोचना शेट्टी मार्ग- सायन सर्कल मार्गे रवाना
– ए-३७६ – सायन रुग्णालय -सुलोचना शेट्टी मार्ग-बावरी कॅम्प- माहीम
– सी-३०५- धारावी आगार- पिवळा बांगला टी जंक्शन- सायन रुग्णालय-बॅकबे आगार
– ३५६ म., ए-३७५, सी-५०५ – कलानगर बी.के.सी- प्रियदर्शनीहून गंतव्यस्थानी
– ७ म., २२ म., २५ म., ४११- महाराष्ट्र काटा-धारावी आगार- टी जंक्शन-सुलोचना शेट्टी मार्ग-सायन रुग्णालय
– ३१२, ए-३४१- महाराष्ट्र काटा-धारावी आगार- टी जंक्शन व सुलोचना शेट्टी मार्ग- सायन सर्कलमार्गे धावतील
– १७६, ४६३ – काळा किल्ला आगार येथून सुटतील व सायन स्थानक ९० फूट मार्गाने लेबर कॅम्प मार्गाने दादर माटुंगा स्थानकाकडे जातील.
खंडित बस फेऱ्या
– ए. सी. ७२ – भाईंदर स्थानक ते काळा किल्ला आगार
– सी-३०२ – मुलुंड बस स्थानक ते काळा किल्ला आगार
– ए.सी. १० जलद, ए-२५, ३५२ या बसगाड्या राणी लक्ष्मीबाई चौक येथे खंडित करून तेथूनच रवाना करण्यात येतील.