• Mon. Nov 25th, 2024
    बँक व्यवस्थापकाच्या घरात घुसून; युवकाचा स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न, कारण अस्पष्ट

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर : बँक व्यवस्थापकाच्या घरात घुसून युवकाने आत्महत्येचा प्रयत्न केला. ही थरारक घटना धंतोली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दीनानाथ हायस्कूलजवळील अग्नी अपार्टमेंट येथील कुमार रिशूसिंग यांच्याकडे घडली. शंकर भीमा धुर्वे (वय ३१, रा. वसंतराव नाईक झोपडपट्टी), असे युवकाचे नाव आहे. याप्रकरणी धंतोली पोलिसांनी शंकर याच्याविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला.पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, सिंग हे धंतोलीतील सेंट्रल बँक ऑफ इंडियात मुख्य व्यवस्थापक आहेत. सिंग यांच्या पत्नी २२ मार्चला सायंकाळी ६,३० वाजताच्या सुमारास मुलगा व मुलीला शिकवणी वर्गातून घेऊन घरी परतल्या. याचदरम्यान शंकर हा त्यांच्या घरात घुसला. त्याने दरवाजा बंद केला. सिंग यांच्या पत्नी व मुले घाबरली. ‘माझ्या मागे काही जण असून, मला मारायला येत आहेत. तुम्ही चूप रहा, मला चाकू द्या’, असे तो सिंग यांच्या पत्नीला म्हणाला. घाबरून सिंग यांच्या पत्नी मुलांना घेऊन घराबाहेर आल्या तसेच बाहेरुन दरवाजा बंद करीत मदतीसाठी आरडाओरड केली.
    महापालिकेचा मनमानी कारभार, ‘वंचित’कडून ३० हजार पाणीबिलांची ‘होळी’
    सुरक्षा रक्षक, चालक व अन्य एक जण तेथे आले. त्यांनी युवकाला आवाज दिला मात्र, त्याने प्रतिसाद दिला नाही. याचदरम्यान त्याने शोकेसची काच फोडून काचेने स्वत:च्या पोटावर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. दरवाजा उघडला असता शंकर हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. एका नागरिकाने धंतोली पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी जखमी शंकरला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याने आत्महत्येचा प्रयत्न का केला याचा तपास पोलिस करीत आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed