• Sat. Sep 21st, 2024
चंद्रपूरमधून प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेसकडून उमेदवारी, वडेट्टीवारांचे प्रयत्न कमी पडले

चंद्रपूर : बहुचर्चित चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची लेक शिवानी वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्यात उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच सुरू होती. अखेर काँग्रेसच्या केंद्रीय समितीने धानोरकर यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांच्याविरोधात धानोरकर यांचं आव्हान असेल. प्रतिभा धानोरकर या दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या पत्नी आणि विद्यमान आमदार आहेत.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचा प्रचार सुरू झालेला असताना दुसरीकडे मात्र काँग्रेस उमेदवाराची घोषणा होत नव्हती. वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्यात उमेदवारीवरून मोठा संघर्ष सुरू होता. पक्षांतर्गत संघर्षाने टोक गाठलेले असताना रविवारी रात्री अधिकृतपणे धानोरकर यांच्या नावाची घोषणा झाल्याने आता वडेट्टीवार बापलेकीला त्यांचा प्रचार करावा लागेल.
उमेदवारी जाहीर होण्याआधीच फेसबुक पोस्ट, दिल्लीतून नवी बातमी, समर्थकांमध्ये एकाच वेळी आनंद आणि अस्वस्थता!

दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्यानंतर त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांनी या मतदारसंघावर दावा केला होता तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची लेक शिवानी वडेट्टीवार यांनीही या मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा दाखविली होती. आपण कामाच्या बळावर उमेदवारी मागत असल्याचे त्या सांगत होत्या. दिल्लीत उमेदवारीसाठी दोघींकडूनही लॉबिंग सुरू होती.
चंद्रपूरची उमेदवारी कुणाला? काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद, वडेट्टीवार समर्थकांकडून इतिहास सांगत धानोरकरांना प्रत्युत्तर

चंद्रपूरच्या प्रचारात ओबीसींचा मुद्दा प्रचारात गाजणार

या मतदारसंघात देशपातळीवरील मुद्द्यांबरोबरच राज्यातील राजकारण आणि स्थानिक मुद्दे चर्चेला येतील. मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनानंतर चंद्रपुरात २१ दिवस अन्नत्याग आंदोलन झाले. ओबीसी संघटना सक्रिय असल्याने समाजाचे प्रश्न अधिक प्रकर्षाने मांडले जातील. ताडोब्यातील पर्यटनसमृद्धीची उदाहरणे सांगताना मानव-वन्यजीव संघर्षात जीव गमावणाऱ्यांचे काय, हा प्रश्न अधिक प्रकर्षाने विचारला जाईल. उद्योगवाढीमुळे प्रदूषण, इरईमधील अतिरिक्त भार, शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा, कापूस आणि सोयाबीनचे कोसळलेले दर, धानाचा रखडलेला बोनस, पर्यटनस्थळांच्या विकासाकडे होणारे दुर्लक्ष हे मुद्देही जोडीला असतील. खुद्द राज्याचे वनमंत्री उमेदवार असल्याने त्यांच्या योजनांतील उणिवांवर बोट ठेवले जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed