• Mon. Nov 25th, 2024
    मॅनहोलवरील सायरनची योजना गुंडाळली, यंत्रणेच्या मर्यादा उघड; नेमकं कारण काय?

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबईतील मॅनहोलवरील झाकणचोरी आणि मॅनहोलमधून पाणी ओसंडून वाहण्यासारख्या घटनांना आळा घालण्यासाठी, मॅनहोलवर सायरन वाजवून इशारा देणारी यंत्रणा १४ ठिकाणी बसवण्यात आली होती. गेल्या तीन महिन्यांपासून या यंत्रणेची चाचणीही घेण्यात येत होती. मात्र, चाचणीमधील तांत्रिक अडचणी आणि ही यंत्रणाही उपयुक्त ठरत नसल्याचे लक्षात आल्याने ही चाचणी बंद करण्याचा निर्णय अखेर मुंबई महापालिकेने घेतला आहे.मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या वर्षी झालेल्या सुनावणीत उघड्या मॅनहोलसंदर्भात मुंबई महापालिकेला खडे बोल सुनावले होते. त्यानंतर मॅनहोलची झाकणे चोरीला जाऊ नयेत, यासाठी इशारा देणारी सायरन यंत्रणा बसवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. यासाठीची नवीन यंत्रणा महापालिकेने एका कंपनीमार्फत मुंबईतील १४ ठिकाणी बसवली. मॅनहोलच्या झाकणाच्या खालच्या बाजूला सायरन वाजणारी यंत्रणा बसवून, तिच्या चाचणीला तीन महिन्यांपूर्वी सुरुवात केली. ही यंत्रणा पालिकेच्या भायखळा येथील नियंत्रण कक्षाला जोडलेली होती. या एकत्रित यंत्रणेअंतर्गत, झाकणचोरीचा प्रयत्न झाल्यास सायरन वाजवणारी यंत्रणा १० ठिकाणी, तर झाकणचोरी आणि मॅनहोलमधील पाणी ओसंडून वाहू लागताच सायरन वाजणारी यंत्रणा चार ठिकाणी होती.
    लोकसभा ही विधानसभेची नांदी, त्यावरच पक्षाचं आणि तुमचं अस्तित्व, मुख्यमंत्र्यांची आमदार खासदारांना वॉर्निंग

    झाकण चोरण्याचा किंवा उघडण्याचा प्रयत्न होताच किंवा पाणी ओसंडून वाहू लागल्यास इशारा देणारा सायरन वाजणार होता. त्यामुळे चोरी पकडणे किंवा पाणी ओसंडून वाहू लागल्यास तातडीने दुरुस्ती करणे शक्य होणार होते. त्याच्या सॉफ्टवेअरसह अन्य चाचण्या घेण्यात येत होत्या. या यंत्रणेला सेन्सरही बसवण्यात आले होते. मात्र, ही योजना अखेर गुंडाळण्यात आली.

    यंत्रणेच्या मर्यादा उघड

    यंत्रणेतील सॉफ्टवेअरचे काम व्यवस्थित होते का, नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्यात काही अडचणी येताहेत का, तसेच झाकण चोरण्याचा किवा उघडण्याचा प्रयत्न होताच स्थानिक पातळीवर मोठ्याने अलार्म वाजून स्थानिकांना याची त्वरित माहिती मिळते का, अशा अनेक चाचण्या केल्या जात होत्या. मात्र, त्यात यश मिळत नव्हते. मुंबईत सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. तिथे ही यंत्रणा कितपत यशस्वी ठरेल, असाही प्रश्न होता. हे सर्व लक्षात घेता, चाचण्या थांबवून ही सायरन यंत्रणा मुंबईत कार्यान्वित न करण्याचा निर्णय महापालिकेने घेतल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

    येथे सुरू होते प्रयोग

    – वरळीतील बीडीडी चाळ येथे दोन ठिकाणी, बाळूशेठ मादुरकर मार्ग येथे एका ठिकाणी

    – परेलमधील जेरबाई वाडिया रोड येथील तीन ठिकाणी, शिवडी क्रॉस रोड येथे दोन ठिकाणी, शिवडीमधील डी. जी. महाजनी मार्ग येथे दोन ठिकाणी

    – ग्रँट रोडमधील त्रिंबक परशुराम लेन येथे एका ठिकाणी

    – ग्रँट रोडमधील एम. एस. अली रोड येथे एका ठिकाणी

    – तुळशीवाडी रोड, भानजीभाई राठोड रोड येथे एका ठिकाणी

    – दादरमधील बापूराव परुळेकर मार्ग येथे एका ठिकाणी

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed