• Sun. Sep 22nd, 2024

निर्भय, निष्पक्ष वातावरणात निवडणुका यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शासकीय यंत्रणांनी समन्वय ठेवावा – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

ByMH LIVE NEWS

Mar 17, 2024
निर्भय, निष्पक्ष वातावरणात निवडणुका यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शासकीय यंत्रणांनी समन्वय ठेवावा – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

जिल्हास्तरीय शासकीय विभाग प्रमुखांची आदर्श आचारसंहिता बाबत आढावा बैठक संपन्न

सोलापूर, दि.17 (जिमाका):- भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 12 एप्रिल रोजी अधिसूचना निघणार असून 19 एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. तर 7 मे रोजी मतदान पार पडणार असून 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. निर्भय , निष्पक्ष वातावरणात निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी परस्परात योग्य समन्वय ठेवावा व आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.

यावेळी अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंग, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, पोलीस उपायुक्त दिपाली काळे, अजित बोराडे, अतिरिक्त आयुक्त संदिप कारंजे, अधिक्षक अभियंता सा.बां. विभागाचे संजय माळी, सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड, जिल्हा परिषद च्या मुख्य वित्त व लेखा अधिकारी मीनाक्षी वाकडे, जिल्हा कोषागार अधिकारी मोमीन, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन धार्मिक, समाजकल्याणचे सहायक आयुक्त नागनाथ चौगुले, जिल्हा अधीक्षक भुमिअभिलेख दादासाहेब घोडके यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने कोणत्याही विभाग प्रमुखांनी नवीन काम सुरू करू नये, नवीन कामाचे कार्यारंभ आदेश वितरित करू नये, जे काम सुरू आहे ते काम पूर्ण करून घ्यावे. तसेच सर्व विभाग प्रमुखांनी त्यांच्याकडील सर्व कामांची व कामांची सद्यस्थितीची माहिती तात्काळ प्रशासनाला सादर करावी. अधिकारी कर्मचाऱ्यांनी कोणत्याही राजकीय पक्ष्यांच्या नेते तसेच मंत्री महोदय यांच्या बैठकीस उपस्थित राहू नये. तसेच त्यांची खाजगीत भेट घेऊ नये, असे आढळून आल्यास संबंधिताविरोध कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी सुचित केले.

आदर्श आचारसंहिता काळात काय करावे आणि काय करू नये याबाबत भारत निवडणूक आयोगाने सुस्पष्ट निर्देश दिलेले आहेत. या निर्देशांप्रमाणे सर्व शासकीय विभागांनी कार्यवाही करणे आवश्यक आहे. सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाल्यापासून 24 तास, 48 तास आणि 72 तासांमध्ये आवश्यक कार्यवाहीची पूर्तता करून त्याबाबतचा अहवाल जिल्हास्तरीय आदर्श आचारसंहिता कक्षाकडे पाठवावा. यामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा होता कामा नये. निवडणूक विषयक कामकाज हे प्राधान्याने आणि अचूकपणे होईल, याची दक्षता घ्यावी. तसेच या काळात सर्व शासकीय विभाग प्रमुखांनी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी समन्वयाने आणि काळजीपूर्वक पार पाडावी, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आशीर्वाद यांनी दिल्या. आचारसंहिता कालावधी टंचाईच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या उपाययोजना राबविण्याबाबत कोणतीही अडचण नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी आचारसंहिता लागू झाल्यानंतर सर्व संबंधित विभाग प्रमुखांनी घ्यावयाच्या दक्षतेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच आचारसंहितेच्या अनुषंगाने आचारसंहिता कक्षाकडे दैनंदिन पाठवण्यात येणाऱ्या विविध अहवालाची माहिती त्यांनी दिली. तसेच शासकीय वाहनाचा निवडणूक कामात वापर होणार नाही याबाबत सर्व संबंधित विभागाने काळजी घ्यावी. सोलापूर शहर नगरपालिका व ग्रामीण भागातील विविध शासकीय मैदाने राजकीय पक्षांना प्रचारासाठी वापरण्यास देण्याबाबत संबंधित विभागाने तात्काळ यादी एक खिडकी योजना राबवणाऱ्या भूमी अभिलेख कार्यालयाकडे पाठवावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने शासकीय विश्रामगृहे राजकीय वापरासाठी उपलब्ध करून देऊ नये, अशी माहिती त्यांनी दिली.

****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed