जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटातर्फे स्वत:सह मुलीने उमेदवारी करण्यास नकार दिल्याने आमदार एकनाथ खडसे यांनी सुनेसाठी सोयीचे राजकारण केल्याचा आरोप होत आहे. अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार,शिंदे गटाचे आ.चंद्रकांत पाटील यांच्यासह शरद पवार गटाचे माजी मंत्री डॉ.सतीश पाटील यांनीही खडसेंनी पक्षाला अडचणीत आणल्याचा आरोप केला जात आहे.
रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढण्यास शरद पवार गटाकडून प्रकृतीचे कारण देत खडसेंनी माघार घेतली.तर त्यांच्या कन्या अॅड.रोहिणी खडसे यांनी आपण विधानसभेसाठी इच्छुक असल्याचे सांगीतले आहे. खडसे कुटुंबीयांच्या या भूमिकेमुळे त्यांनी शरद पवार गटास ऐनवेळी अडचणीत आणल्याचा आरोप केला जात आहे. एकनाथ खडसे महाविकास आघाडीकडून कच्चा उमेदवार देवून ही जागा भाजपाला जिंकून देण्याचा डाव खेळत असल्याचा आरोप मुक्ताईनगरचे शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी काल केला होता. त्यापाठोपाठ आज अजित पवार गटाचे संजय पवार यांनी खडसेंवर टीकास्त्र डागले आहे.
काय म्हणाले संजय पवार?
एकनाथराव खडसे स्वार्थी आहेत. त्यांनी भूतकाळात मंत्रीपदाचा वापर करून विविध पदे त्यांच्या घरामध्ये ओढून घेतली.वयाच्या ८४ व्या वर्षी शरद पवार यांचा विश्वासघात करून भाजपाकडून सुनेला तिकीट मिळवून घेतले असा खळबळजनक आरोप अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी आहे. खडसेंनी मंत्रीपदाचा वापर केवळ स्वार्थासाठी घरामध्ये त्यांनी पदे पदरात पाडून घेतली. आता देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटांमध्ये रवींद्र पाटील,सतीश पाटील,गुलाबराव देवकर असे विविध गट गट त्यांनी निर्माण केले आहेत. सहकारात त्यांनी अनेक लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी नेमकी निष्ठा कोणाशी हे सिद्ध करावे,असे देखील संजय पवार म्हणाले.
पक्षातून डॉ. सतीश पाटलांकडून घरचा आहेर
विरोधक असलेल्या शिंदे गट व अजित पवार गटाकडून खडसेंवर आरोप केले जात असतांनाच आता त्यांच्याच शरद पवार गटातून देखील माजी डॉ.सतीश पाटील यांनी घरचा आहेर दिला आहे. खडसे अडचणीत असतांना पक्षाने त्यांना मदत केली आहे. त्यामुळे आता पक्ष अडचणीत असतांना त्यांनी पक्षाला मदत करण्याची गरज होती. मात्र,मागील सहा महिन्यापासून मी निवडणुक लढवेल अशा घोषणा करणाऱ्या खडसेंनी आता उमेदवारी करण्यास नकार देत पक्षाला अडचणीत आणल्याचे डॉ.पाटील म्हणाले. खडसेंनी सुनेच्या सोयीसाठी राजकारण केल्याची चर्चा लोकांमध्ये सुरु आहे, त्यात तथ्य वाटत असल्याचा आरोपही डॉ.सतीश पाटील यांनी केला आहे.