• Sat. Sep 21st, 2024

‘बारामती’मध्ये शिवतारे अपक्ष उभे राहणार ? पवारांच्या जाचाला कंटाळून मतदारांना पर्याय देण्याचा दावा

‘बारामती’मध्ये शिवतारे अपक्ष उभे राहणार ? पवारांच्या जाचाला कंटाळून मतदारांना पर्याय देण्याचा दावा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार विरुद्ध शरद पवार असे चित्र रंगत असतानाच त्याला आता आणखी वेगळे वळण मिळाले आहे. महायुतीतील शिवसेनेचे पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी या वादात उडी घेत दोन्ही पवारांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. त्यावेळी आपण महायुतीच्या किंवा त्यांच्या विचारांच्या विरोधात नसल्याचेही स्पष्ट केले. त्यामुळे आता शिवतारेंना महायुती रोखणार की अजित पवार यांची डोकेदुखी वाढणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी बारामतीमधून सुप्रिया सुळे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. दुसरीकडे, सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जाहीर करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्याकडे केली आहे. त्यामुळे पवार विरुद्ध पवार असे चित्र रंगत असताना दुसरीकडे काही दिवसांपूर्वी ‘लोकसभेचे नंतर, आधी आमचे पहा,’ अशी तक्रार करणाऱ्या पुरंदरच्या विजय शिवतारे यांनी आता थेट दोन्ही पवारांविरोधात दंड थोपाटल्याने राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.

‘ज्यांच्या जाचाला, दादागिरीला कंटाळून अनेक जण शिवसेना किंवा भाजपमध्ये गेले आहेत. तेच अजित पवार आता महायुतीत आल्याने त्यांना मतदान करण्यास भाजप सांगत असेल तर आम्ही कसे मतदान करायचे अशी भूमिका अनेक मतदारसंघात आहे. त्यामुळे पवार विरुद्ध पवार लढाईत आपण उतरणार होत. मतदारसंघात अपक्ष म्हणून निवडणुकीस उभे राहणार आहे’, अशा शब्दांत पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी भूमिका मांडली.

पवारांविरोधात पावणेसहा लाख मते

‘बारामती लोकसभा मतदारसंघ हा कोणा एकाचा सातबारा नाही. पवारांविरोधात पाच लाख ८० हजार मतदान आहे. एकीकडे पवार विरुद्ध पवार अशी लढाई दाखविली जात आहे. पवारांना विरोध करणारे लोक खूप मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांनी मतदान कोठे करायचे’, असा सवाल शिवतारे यांनी उपस्थित केला. विधानसभेला ‘कसा निवडून येतो बघतोच,’ असे खुले आव्हान अजित पवार यांनी आपल्याला दिले होते. सहा सात पक्ष एकत्र करून कट कारस्थाने केली आहेत. अजित पवार अशा पद्धतीने पुरंदरच्या जनतेशी वागले आहेत. त्यामुळे पुरंदरची जनता कोणत्या परिस्थितीत मतदान करणार असा प्रश्न उपस्थित करीत नरेंद्र मोदी विचारमंचाच्या रुपाने आपण रिंगणात उतरणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed