• Mon. Nov 25th, 2024

    ठाकरेंना साथ, लेकाचं भावनिक भाषण, भास्कर जाधवांना मंचावरच रडू कोसळलं…

    ठाकरेंना साथ, लेकाचं भावनिक भाषण, भास्कर जाधवांना मंचावरच रडू कोसळलं…

    चिपळूण (रत्नागिरी) : जनतेने दाखविलेल्या अतुट विश्वासाबद्दल त्यांचे ऋण व्यक्त करणारे पत्र शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी लिहिल्यानंतर आज त्यांनी चिपळूणमध्ये सभेचे आयोजन केले होते. या सभेत त्यांचे चिरंजीव विक्रांत जाधव यांनी भावनिक भाषण केले. भास्कर जाधव यांच्या मनातील ‘कभी खुशी कभी गम’ अशा भावना मांडल्यानंतर भास्कर जाधव यांना मंचावरच रडू कोसळले.

    भास्कर जाधव हे उद्धव ठाकरे यांची साथ कधीच सोडणार नाही. पाठ दाखवून पळणं आमच्या रक्तात नाही. शिवसेना आणि ठाकरे अडचणीत असताना भास्कर जाधव यांनी कोणाचाही मुलाहिजा न बाळगता ठाकरेंची खंबीरपणे बाजू घेतली, अशा भावना विक्रांत व्यक्त करत असतानाच भास्कर जाधव यांचे डोळे पाण्याने डबडबले. त्यांच्या अश्रूंचा अखेर बांध फुटला. मंचावरच त्यांना रडू कोसळलं.

    आजकाल लोकांना आमिषे दाखवून, पैसे दाखवून सभेला लोकांना आणले जाते. परंतु गेली कित्येक वर्षे तुम्ही भास्कर जाधव साहेबांवर मनापासून प्रेम केले, त्यांना तब्बल सहा वेळा निवडून दिले. मला आयुष्यात जर काही कमवायचे असेल तर माझ्या वडिलांनी जसे ४० वर्ष तुमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेचे प्रेम कमावले ते प्रेम मला कमवायचे आहे. मला दुसरं काहीही नको, असं विक्रांत म्हणाले. त्याक्षणीही भास्कर जाधव खूपच भावुक झाले.

    लेकाचं भाषण ऐकून भास्करशेठ यांच्या डोळ्यात पाणी


    दुसरीकडे भास्कर जाधव यांनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांच्याविरोधातही नाराजीचा सूर आळवला. शिवसेना फुटली तेव्हा गटनेता म्हणून त्या पदावर माझा दावा होता पण त्यावेळी मला गटनेता केलं नाही. तेव्हा मी फार काही बोललो नाही. शिवसेना फुटीनंतर ज्यावेळी मुंबईत बैठक बोलावली, त्यावेळी ‘वर्षा’वर मी उद्धव ठाकरेंना समोरासमोर सांगितलं जर आपण भाजपबरोबर जात असाल मी येणार नाही. मी माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी कधी काही केलं नाही. राष्ट्रवादी असताना मी मंत्री होतो, मात्र सिनिअर असूनही मला इकडे आल्यावर मंत्रिपद दिलं नाही. मी त्यावेळी अन्याय झाल्याची भावना बोलून दाखवणार नाही आणि यापुढेही असं काही बोलणार नाही. पण ज्यांना उद्धवसाहेबांनी मंत्रिपदं दिली, त्यांनी भाजपविरोधात कधी शब्द तरी काढला का? असा सवाल यावेळी भास्कर जाधव यांनी बोलून दाखवला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed