नेमकं प्रकरण काय?
कन्नड सहकारी साखर कारखाना दिवाळखोरीत निघाल्यानंतर राज्य सहकारी बँकेने लिलाव केला. हा कारखाना आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो लिमिटेडने ५० कोटी रुपयांमध्ये खरेदी केला होता. या प्रक्रियेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. याच प्रकरणी ईडीने बारामती अॅग्रोची चौकशी केली. रोहित पवार यांनाही ईडीने चौकशीसाठी बोलावलं होतं. या लिलाव प्रक्रियेतील कंपन्यांचे एकमेकांतले व्यवहार हे संशयास्पद असल्याचा ठपका ईडीकडून ठेवण्यात आला.
संबंधित लिलाव प्रकरणात बारामती अॅग्रो, हायटेक इंजिनिअरिंग, समृद्धी शुगर या कंपन्या सहभागी आहेत. हायटेक कंपनीने लिलावासाठी पाच कोटी रूपयांची रक्कम भरली होती. ती रक्कम बारामती अॅग्रोकडून घेतल्याचं बोललं गेलं. विविध बँकांतून खेळत्या भांडवलासाठी घेतलेली रक्कम बारामती अॅग्रोने कारखाना खरेदीसाठी वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या कारखान्याची स्थापना १९७३-७४ साली रामराव अण्णा बहिरागवकर यांचे चुलत भाऊ व त्यावेळी जालना औरंगाबादचे खासदार बाळासाहेब पवार यांनी केली होती. कारखाना दिवाळखोरीत होता त्यावेळी ८० कोटी कर्ज होतं, त्यातील कर्मचाऱ्यांनी ३० कोटी भरले. मात्र ५० कोटीसाठी सहकारी बँकेने हा कारखाना सील केला होता. हा कारखाना २००९ ला जप्त झाला. नंतर कारखाना विक्रीसाठी काढण्यात आला. यावेळी रोहित पवारांच्या बारामती ॲग्रो कंपनीने १२-१२- २०१२ रोजी शरद पवार यांच्या वादिवसानिमित्त कारखाना खरेदी केली. ५०० कोटी किंमत असलेला कारखाना बारामती ऍग्रो कंपनीने ५० कोटीमध्ये खरेदी केला होता.