मुख्यमंत्रिपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरला होता आणि ही गोष्ट आम्ही नाकारतच नाही. भाजपचे १०५ आमदार असल्यानं पहिला मुख्यमंत्री त्यांचा होईल असं ठरलं. त्यानंतरची अडीच वर्षे शिवसेनेला मुख्यमंत्रिपद मिळणार होतं. पण उद्धव ठाकरेंचा पवित्रा पाहून भाजपनं आधीची अडीच वर्षे तुमचा मुख्यमंत्री होऊ दे, असा प्रस्ताव दिला. पण ठाकरेंनी त्यांना प्रतिसादच दिला नाही, असा दावा शिरसाट यांनी केला.
सुरुवातीची अडीच वर्ष तुमचा मुख्यमंत्री होऊ दे, अशी ऑफर भाजपनं दिली. पण शरद पवारांनी दिलेल्या प्रस्तावामुळे उद्धवजींची नियत फिरली. आम्हाला सत्तेची हाव नाही. पाच वर्षे तुमचा मुख्यमंत्री होऊ द्या. पण आपण भाजपला सत्तेबाहेर ठेवू, अशी ऑफर पवारांनी दिली. त्यानंतर सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरेंनी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला, असा घटनाक्रम शिरसाट यांनी कथन केला.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे करत असलेली विधानं, त्यांचा बदललेला पवित्रा पाहता भाजपनं शिवसेनेला आधीची अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याची तयारी दर्शवली. तुम्ही मुख्यमंत्रिपद घ्या. पण बोलणी तर होऊ द्या, अशी भाजपची भूमिका होती. पण कोणीही बोलणीला जायचं नाही, असे आदेश उद्धव ठाकरेंनी आम्हाला दिले, असं शिरसाट यांनी सांगितलं.
तुम्ही ५ वर्षे मुख्यमंत्री राहा. आपण भाजपला सत्तेबाहेर ठेवू, अशी गुगली शरद पवारांनी टाकली. शरद पवारांच्या ऑफरनंतर उद्धव यांनी भाजपशी बोलणी टाळली. सत्तेच्या लालसेपोटी ते काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेले. बाळासाहेब ठाकरेंना अशा प्रकारची आघाडी कधीही मान्य झाली नसती. पण उद्धव ठाकरेंनी काँग्रेस, राष्ट्रवादीशी आघाडी केली. त्याचा परिणाम पुढे पक्षफुटीत झाला, असं शिरसाट म्हणाले.