• Sat. Sep 21st, 2024
शरद पवार-उद्धव ठाकरे साथीला असणार, राहुल गांधींची शिवाजी पार्कात तोड धडाडणार

मुंबई : राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर अशी दक्षिणोत्तर भारत जोडो यात्रा पूर्ण केल्यानंतर आता मणिपूर ते मुंबई अशी पूर्व पश्चिम भारत जोडो न्याय यात्रा सुरू केली आहे. या यात्रेच्या समारोप सभेसाठी काँग्रेसने मुंबईतील शिवाजी पार्क मैदानाची मागणी केली होती. त्यानुसार राज्य सरकारने शिवाजी पार्क येथे सभेला परवानगी दिली आहे.

राहुल गांधी यांनी ७ सप्टेंबर २०२२ रोजी कन्याकुमारी येथून भारत जोडो यात्रेला सुरुवात केली होती. या यात्रेत तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तरप्रदेश, दिल्ली, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, लडाख, काश्मीर या राज्यातून यात्रा पूर्ण केली होती. या यात्रेला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर राहुल गांधी यांनी मणिपूरमधील भारत जोडो न्याय यात्रा सुरू केली. या यात्रेत अनेक ठिकाणी पोलीस परवानगी आणि इतर कारणांमुळे अडचणी निर्माण झाल्या. त्यातच बिहार मधील पाटणा येथील गांधी मैदानावर झालेल्या सभेला मोठा प्रतिसाद होता. त्याच पद्धतीने ही यात्रा नंदुरबार जिल्ह्यातील महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. तर या यात्रेचा समारोप मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे. त्यासाठी काँग्रेसने राज्य सरकारकडे शिवाजी पार्क मैदान मिळवण्यासाठी विनंती अर्ज केला होता. त्यावर सरकारने सकारात्मक प्रतिसाद देत राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपाच्या सभेला परवानगी दिली आहे.

इंडिया आघाडीतील घटकपक्ष होणार सहभागी

राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या तयारीसाठी काँग्रेसचे महासचिव के सी वेणुगोपाल, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत मुंबईतील हॉटेल ललित येथे बैठक झाली. या बैठकीत तयारीसाठी जबाबदाऱ्या वाटून देण्यात आल्या आहेत. तसेच या सभेसाठी महाविकास आघाडी बरोबरच इंडिया आघाडीतील घटक पक्षांना निमंत्रण दिले जाणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिली.

नाना पटोले यांची सरकारवर आगपाखड

नाना पटोले बैठकीतनंतर बोलताना म्हणाले की, राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा नंदुरबार मधून मुंबईत येत आहे. ही यात्रा शिवाजी महाराज यांच्या भूमीत, शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांच्या मातीत येणार आहे. या महापुरुषांचे विचार मातीत घळणात्यांच्या विरोधात आम्ही इंडिया आघाडी म्हणून एकत्र येणार आहोत. तसेच सरकारच्या विरोधात शंखनाद करणार असल्याचं नाना पटोले यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed