लोकसभा निवडणूक एप्रिल महिन्यात होणार असून, त्यासाठीची तयारी सर्वच पक्षांकडून सुरू झाली आहे. राज्यातील बदलत्या राजकीय वातावरणामुळे भाजपने राज्यातील लोकसभेच्या सर्वाधिक जागा जिंकण्यासाठी व्यूहरचना आखली आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे दोन गट झाल्यामुळे विरोधकांची ताकद कमी झाल्याचा फायदा उचलण्यासाठी भाजप आक्रमक झाला आहे.
भाजपने उत्तर प्रदेशचा पॅटर्न राज्यातही वापरण्यास सुरुवात केली असून, अयोध्या, वाराणसीच्या धर्तीवर महाराष्ट्रात नाशिकवर लक्ष केंद्रित केले आहे. त्याचाच भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जानेवारीत नाशिकचा दौरा करून भाजपसाठी वातावरणनिर्मिती केली. त्यानंतर भाजपच्या लोकप्रतिनिधींनी नाशिकची जागा शिवसेनेऐवजी भाजपला सोडावी, अशी मागणी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यात भाजपच्या सर्वेक्षणात शिवसेना आणि राष्ट्रवादीमुळे (अजित पवार गट) भाजपला नुकसान होणार असल्याने भाजपने आता सावध पवित्रा घेत घटक पक्षांवर दबाव वाढवला आहे.
शिवसेना शिंदे गटाकडे असलेल्या लोकसभेच्या अतिरिक्त जागा भाजपने आपल्या पारड्यात पाडून घेण्याची तयारी केली असून, त्यात नाशिकचाही समावेश असल्याची चर्चा आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही याबाबत घटक पक्षांशी चर्चा केली असून, शिंदे गटाला भाजपसाठी चार ते पाच जागा सोडाव्या लागण्याची शक्यता आहे. त्यात नाशिकचाही समावेश असल्याने शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
स्थानिक नेत्यांचाही दबाव
भाजपच्या जिल्ह्यातील पाच आमदारांसह तीन जिल्हाध्यक्ष, ज्येष्ठ नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नाशिक लोकसभेची मागणी आधीच केलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नाशिक दौऱ्यानंतर नाशिक लोकसभेची जागा भाजपकडून लढण्यासाठी अनेकांनी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे भाजपच्या कोअर कमिटीनेच थेट नाशिकवर दावा ठोकत थेट दिल्लीपर्यंत धाव घेतल्यानंतर नाशिकच्या जागेबाबत सूत्रे फिरली आहेत. शिंदे गटाला जागा गेल्यास ही जागा हातची जाईल, अशी माहिती स्थानिकांकडून वरिष्ठांपर्यंत पोहोचविण्यात आली. त्यामुळे स्थानिकांच्या दबावामुळे आता पक्षनेतृत्वही आक्रमक झाल्याने शिंदे गटाला धोका निर्माण झाला आहे.