• Sat. Sep 21st, 2024

आधी आमचे मिटवा, मग लोकसभेचे पाहू! बारामतीतील विधानसभा इच्छुकांचा भाजप- शिवसेना श्रेष्ठींना थेट इशारा

आधी आमचे मिटवा, मग लोकसभेचे पाहू! बारामतीतील विधानसभा इच्छुकांचा भाजप- शिवसेना श्रेष्ठींना थेट इशारा

म. टा. प्रतिनिधी, पुणे: बारामती लोकसभा मतदारसंघातील विधानसभा इच्छुकांनी ‘आमचे आधी मिटवा, तरच लोकसभा निवडणुकीत कोणाचे काम करायचे, ते ठरवता येईल,’ अशा शब्दांत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या श्रेष्ठींना इशारा दिला आहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेससाठी महायुतीतील सहकारी पक्षाच्या नेत्यांकडून डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.बारामती, शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीतील समन्वयकांची पुण्यात बैठक झाली. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षीय उपस्थितीत झालेल्या या बैठकीत बारामती लोकसभा मतदारसंघातील पुरंदर, भोर, बारामती, इंदापूर, दौंड या पाच विधानसभा मतदारसंघांतील भाजप, सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे समन्वयक उपस्थित होते. त्या वेळी पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे, दौंडचे आमदार राहुल कुल उपस्थित होते. या बैठकीकडे हर्षवर्धन पाटील यांनी पाठ फिरविली होती.

या वेळी इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भूमिका मांडली. तालुक्यात हर्षवर्धन पाटील महायुतीच्या विरोधात भूमिका घेत आहेत. ते ‘राष्ट्रवादी’च्या कार्यकर्त्यांना त्रास देत असल्याची तक्रार करण्यात आली. पुरंदर विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेले माजी मंत्री विजय शिवतारे यांनी काही दिवसांपूर्वी बारामतीत, ‘अजितदादांनी, पुरंदर विधानसभेचा मला शब्द द्यावा,’ अशी जाहीर मागणी केली होती. त्याचा या बैठकीत त्यांनी पुनरुच्चार केला.

नाशिक ते ईशान्य मुंबई, राष्ट्रवादी लोकसभेच्या १३ जागांसाठी इच्छुक, बारामतीची जागा राष्ट्रवादीला आल्यास..

मुंबईत बैठक घेण्याची मागणी

‘लोकसभा निवडणुकांचे नियोजन करण्यापूर्वी विधानसभेचे आमचे आधी मिटवा. मग लोकसभेचे काम करायचे का ते पाहू,’ अशा शब्दांत शिवतारे यांनी भाजप, राष्ट्रवादीच्या नेत्यांना इशारा दिला. या संदर्भात लोकसभेतील काही प्रमुख समन्वयकांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासोबत संयुक्त बैठक मुंबईत घ्यावी, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली.

हर्षवर्धन पाटील इच्छुक

शिवतारे यांच्यापाठोपाठ इंदापूरमधून विधानसभेसाठी हर्षवर्धन पाटील इच्छुक आहेत. सध्या तालुक्यात जिल्हा परिषदेच्या गटनिहाय कार्यकर्त्यांच्या ‘विजय संकल्प २०२४’ अशा अर्थाने बैठका घेण्याचा त्यांनी सपाटा लावला आहे.

शरद पवारांनी तिकीट कापलं, अजित पवारांनी खोडा घातला, हर्षवर्धन पाटलांचा पवारांशी छत्तीसचा आकडा

‘राष्ट्रवादी’च्या आश्वासनानंतरच…

लोकसभेच्या गेल्या तीन निवडणुकांत अजित पवार यांच्यासह पवार कुटुंबीयांनी आपल्याकडून मदत घेतली. मात्र, विधानसभेत दगाफटका केला. त्यामुळे लोकसभेला राष्ट्रवादीला मदत करायची की नाही, याबाबत कार्यकर्त्यांची मते जाणून घेऊन दबावतंत्र वाढविण्याचे पाटील यांच्याकडून सुरू आहे. ‘राष्ट्रवादी’ने विधानसभेला मदत करण्याचे आश्वासन दिले, तरच लोकसभेला मदत केली जाईल, असा पवित्रा हर्षवर्धन पाटील यांनी घेतल्याची चर्चा सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed