• Sat. Sep 21st, 2024

नाशिक जिल्ह्यावर जलसंकट! ५ वर्षांतील यंदा नीचांकी भूजलसाठा, ‘या’ १० तालुक्यांत पाणीपातळी ५ मीटरखाली

नाशिक जिल्ह्यावर जलसंकट! ५ वर्षांतील यंदा नीचांकी भूजलसाठा, ‘या’ १० तालुक्यांत पाणीपातळी ५ मीटरखाली

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : यंदा पावसाने आखडता हात घेतल्याने जिल्ह्याच्या भूजलपातळीत सातत्याने होत असलेली घट नाशिककरांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. मागील पाच वर्षांच्या तुलनेत यंदा सर्वाधिक जलपातळीत घट झाल्याचे निरीक्षण जिल्ह्यातील भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडून नोंदविण्यात आले आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांपैकी दहा तालुक्यांतील पाणीपातळी पाच मीटरखाली असून, यामध्ये नाशिक आणि निफाडसारख्या तालुक्यांचाही समावेश आहे. त्यामुळे येत्या काळात नाशिककरांसमोर जलसंकट अधिक गंभीर होण्याची चिन्हे आहेत.अपेक्षेच्या तुलनेत अतिशय कमी प्रमाणात झालेला पाऊस, शेती आणि अन्य कारणांमुळे सातत्याने सुरू असलेला पाण्याचा उपसा आणि वाढते तापमान यामुळे पाण्याच्या पातळीत दिवसेंदिवस घट होत आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागामार्फत काही दिवसांपूर्वीच जिल्ह्याच्या भूजलपातळीचा जानेवारी अखेरचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.

…असे केले निरीक्षण

विभागाच्या अहवालानुसार गेल्या पाच वर्षांत यंदा भूजलसाठा सर्वात नीचांकी स्तरावर गेला आहे. यंत्रणेने जिल्ह्यातील एकूण १८५ विहिरींच्या भूजल पातळीचे निरीक्षण केले आहे. या निरीक्षणाच्या माध्यमातून अहवाल जाहीर करण्यात आला आहे. अहवालानुसार जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील भूजलपातळीत घट झाली असून निफाड, येवला, कळवण, चांदवड, बागलाण, मालेगाव या तालुक्यांची स्थिती अधिक गंभीर आहे. त्यामुळे येणाऱ्या पावसाच्या हंगामावर आता भिस्त असणार आहे.

मार्चअखेरीस पुन्हा घेणार नोंद

जानेवारीअखेरीस झालेल्या चाचणीनंतर भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा मार्चअखेरीस पुन्हा पाण्याची नोंद घेणार असल्याची माहिती विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. यावेळी मार्चपर्यंत पाणीपातळी कशी असू शकते, तसेच यापुढील उपाययोजनांचाही आढावा घेतला जाणार आहे.
राष्ट्रवादी फुंकणार ‘तुतारी’; शरद पवारांची १३ मार्चला निफाडमध्ये पहिली सभा, भुजबळ, भाजप निशाण्यावर
अशी आहे सद्यस्थिती (भूजलपातळी मीटरमध्ये)
तालुका—-पाच वर्षांची सरासरी—–जानेवारीची स्थिती–घट

चांदवड ——५.२०—————-७.५५———२.३५
मालेगाव —–५.७२—————-७.७१———२.००
निफाड——-४.२७—————-५.९७———१.७०
कळवण ——६.३७—————-७.९०———१.५३
येवला ——४.३०—————–५.८१———१.५१
बागलाण——७.१५—————-८.३३———१.१९
नांदगाव —–५.१०—————–६.२०———१.१०
नाशिक ——४.२५—————–५.१६———०.९०
सुरगाणा —–३.४५—————–४.२४———०.७९
दिंडोरी ——-४.२६—————–४.९६———०.७०
देवळा ——-५.४५—————–६.०७ ———०.६२
इगतपुरी ——२.५५—————–३.१६ ———०.६१
पेठ ———३.३०——————३.८८———०.५८
त्र्यंबकेश्वर —२.५०——————३.०१———-०.५१
सिन्नर —— ५.१०——————५.४७———०.३७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed