नंदुरबार, दिनांक 04 मार्च (जिमाका वृत्त) : नंदुरबार सारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यात पासपोर्ट केंद्र सुरू झाल्याने या जिल्ह्याची ग्लोबल ओळख निर्माण होणार आहे. तसेच जिल्ह्यात स्वंतंत्र विमानतळ मंजूर व्हावे, यासाठी प्रयत्न करणार, असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.
ते आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात सुरू करण्यात आलेल्या डाकघर पासपोर्ट सेवा केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, पासपोर्ट अधिकारी राजेंद्र गावंडे, धुळ्याचे विभागीय पोस्ट अधिक्षक पी.आर.सोनवणे, नंदुरबारचे पोस्ट मास्तर बी.एस. जोशी, सहाय्यक पोस्ट मास्तर व्हि.आर. चव्हाण, मनोज कुमार यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री डॉ. गावित म्हणाले, या जिल्ह्याच्या खासदार डॉ. हिना गावित निवडून आल्यापासून जिल्ह्यात वीज, आरोग्य केंद्र, वैद्यकीय महाविद्यालय, शिक्षण, राष्ट्रीय महामार्गांचे विस्तारीकरण, रेल्वे मार्ग आणि रेल्वे गाड्यांचे विस्तारीकरण, आकाशवाणी केंद्र, पासपोर्ट ऑफिस यासारख्या सुविधा प्रधानमंत्री मोदी यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत. जे प्रश्न मांडले त्या प्रश्नावर तात्काळ तोडगा प्रधानमंत्री मोदी यांनी या जिल्ह्यासाठी दिला आहे. लवकरच उपसा जलसिंचन योजना, उकाई बॅकवॉटर च्या माध्यमातून जिल्ह्यात सिंचनाचे जाळे निर्माण होते आहे. वस्रोद्योग आणि शेतीपूरक व्यवसायांचे क्लस्टर जिल्ह्यात निर्माण होताहेत. रोजगारासाठी होणारे स्थलांतर या माध्यमातून थांबणार आहे. आता पासपोर्ट ऑफिसच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याची ग्लोबल ओळख निर्माण होणार असल्याचेही यावेळी मंत्री डॉ. गावित यांनी यावेळी सांगितले.
शिक्षण आणि नोकरीसाठी विदेश जाणाऱ्यांना दिलासा देणारे केंद्र – डॉ. हिना गावित
विविध संसदीय शिष्टमंडळांसोबत मला विदेश जाण्याची संधी मिळाली. मी ज्या देशांना भेटी दिल्या त्या प्रत्येक देशात नंदूरबारचे शिक्षण आणि नोकरीसाठी गेलेले नागरिक मला भेटतात. वेळेवर पासपोर्ट मिळावा यासाठी शिफारस मागण्यासाठीही नागरिक येत असतात. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात स्थानिक पातळीवर पासपोर्ट केंद्र असायला पाहिजे हे लक्षात आल्यानंतर त्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा सुरू केला. उत्तर महाराष्ट्रात खानदेशात सर्वप्रथम पासपोर्ट केंद्र हे नंदुरबारचे मंजूर झाले आहे. या केंद्रात एकाच ठिकाणी अर्ज, डाक्युमेंट व्हेरीफिकेशन, बायोमॅट्रीक्स सारखी कामे होणार आहेत. त्यामुळे या आदिवासी बहुल जिल्ह्यातील शिक्षण आणि नोकरीसाठी विदेश जाणाऱ्यांना दिलासा देणारे केंद्र म्हणून या पासपोर्ट केंद्राकडे पाहायला हवे, असे प्रतिपादन यावेळी खासदार डॉ. हिना गावित यांनी मनोगत व्यक्त करताना केले.
यावेळी पोस्ट अधिकारी मनोज कुमार व पासपोर्ट अधिकारी राजेंद्र गावंडे यांनी प्रास्ताविक केले.
0000000000