• Sat. Sep 21st, 2024
काँग्रेसमधून कोणी समोर येत नसेल तर मी लढेन, नांदेडमध्ये ठाकरेंच्या वाघाची डरकाळी

नांदेड: महाविकास आघाडीमध्ये लोकसभेच्या जागा वाटपाचा तिढा कायम आहे. जागा वाटपावरून अद्याप चर्चा सुरुच आहे. काँग्रेसचा बाल्लेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदेडमध्ये काँग्रेसकडून उमेदवार कोण राहणार याबाबत अद्याप ही अस्पष्टता आहे. त्यातच ठाकरे गटाचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी नांदेडमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. नांदेड लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसकडे उमेदवार नसेल किंवा कुठल्या चौकशीला भिऊन जर समोर कोणी येत नसेल तर मी स्वत: नांदेड लोकसभेची निवडणूक लढवायला तयार असल्याची इच्छा माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी व्यक्त केली आहे.

वानखेडे पुढे म्हणाले की, कॉंग्रेसने नांदेड लोकसभेची जागा उद्धव ठाकरे गटाला सोडावी आणि मी इथून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारा विरोधात निवडणूक लढवायला तयार असून निवडणूक जिंकून सुद्धा दाखवणार असल्याचं देखील माजी खासदार वानखेडे म्हणाले. आम्हाला भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक ठिकाणी पराभव करायचा आहे. भाजपाला मराठी माणसांची ताकत दाखवून द्यायची आहे. इथे चौकशीला घाबरुन उमेदवार समोर येत नसतील तर कॉंग्रेसने ही जागा ठाकरे गटाला द्यावी, मी भाजपाच्या उमेदवारा विरोधात निवडणूक लढवणार असल्याचे ते म्हणाले.

कोण आहेत सुभाष वानखेडे?

सुभाष वानखेडे हे हिंगोली लोकसभेचे शिवसेनेचे माजी खासदार आहेत. हदगाव विधानसभा मतदार संघातून ते तीन टर्म आमदार देखील राहिले आहेत. नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात त्यांच चांगल वर्चस्व आहे. २०१९ च्या लोकसभा सभेच्या निवडणुकीत त्यांनी शिवसेना सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. काँग्रेसकडून त्यांनी हिंगोली लोकसभेची निवडणूक लढवली होती, मात्र त्यांचा पराभव झाला होता. या पराभवानंतर काही वर्षांपूर्वी पुन्हा ते शिवसेनेत परतले.

काँग्रेसकडून प्रबळ उमेदवाराचा शोध

नांदेड हा काँग्रेसचा बाल्लेकिल्ला म्हणून ओळखला जातो. स्थानिक स्वराज्य संस्थेत काँग्रेसची सत्ता आहे. मात्र, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे पक्ष सोडून भाजपात गेल्यानंतर काँग्रेसमध्ये गळती सुरु आहे. अनेकजण काँग्रेस सोडून अशोक चव्हाण यांना समर्थन देत भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे आगामी लोकसभेसाठी काँग्रेसकडून प्रबल उमेदवाराची चाचपणी केली जातं आहे. माजी आमदार वसंत चव्हाण यांच्या नावाची चर्चा देखील सुरु आहे. दरम्यान, शेतकरी कामगार पक्ष महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा आशाताई शिंदे यांना गळाला लावण्यासाठी काँग्रेस कडून प्रयत्न केले जातं आहे. मागील आठवड्यात मुंबई येथे त्यांचा पक्ष प्रवेश निश्चित होता. मात्र त्यांचा प्रवेश झाला नाही. आशाताई शिंदे या लोहा-कंधार विधानसभेचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या पत्नी असून भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या त्या भगिनी आहेत. त्यांचा काँग्रेस मध्ये प्रवेश झाला असता तर, लोकसभेसाचा उमेदवार म्हणून पाहिले जात होते. परंतु त्याही काठावरच आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed