मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून ११ हून अधिक जागा तर अजित पवार यांच्याकडून ९ ते १० जागा मागण्यात आल्या आहेत. पण भाजपला यावेळी राज्यात ३० जागांवर लढायचे आहे. भाजपने काल शनिवारी पहिली यादी जाहीर केली होती, ज्यात महाराष्ट्रातील एकाही जागेचा समावेश नव्हता. आता पक्षाची दुसरी यादी ८ मार्चला जाहीर होण्याची शक्यता आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची पुढील बैठक ६ मार्चला होणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपने आतापर्यंत शिंदे यांच्या शिवसेनेला ७ तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला ४ जागा सोडण्याची ऑफर दिल्याचे समजते. पहिल्या यादीत १९५ उमेदवारांमध्ये राज्यातील एकही उमेदवार नसल्याने आता अशी चर्चा सुरू झाली आहे की भाजप राज्यात आतापर्यंत सर्वाधिक जागांवर निवडणूक लढू शकते. महाराष्ट्रात पक्षाने आजवर इतक्या जागांवर उमेदवार उभे केले नव्हते. गेल्या म्हणजे २०१९च्या निवडणुकीत भाजपने २६ जागांवर उमेदवार उभे केले होते, त्यापैकी २३ जागा जिंकल्या होत्या. यावेळी महायुतीसोबत त्याने ४५ जागा जिंकण्याचे लक्ष ठेवले आहे. गेल्यावेळी शिवसेनेसोबत त्यांनी ४१ जागा जिंकल्या होत्या.
२००९ साली भाजप-शिवसेनेने ४७ जागा लढवल्या होत्या त्यापैकी २० जागा जिंकल्या. तेव्हा भाजपने २५ तर शिवसेनेने २२ जागा लढवल्या होत्या. दोन्ही पक्षांना अनुक्रमे ९ आणि ११ जागा मिळाल्या. २००४ साली भाजपला २६ पैकी १३ जागा मिळाल्या, तर शिवसेनेला २२ पैकी १२ जागा मिळाल्या. १९९९ साली दोन्ही पक्षांना मिळून २८ जागा मिळाल्या होत्या. त्यातील भाजपच्या १३ तर शिवसेनेच्या १५ जागा होत्या.