• Sat. Sep 21st, 2024

भारतीय डाळिंब समुद्रमार्गे अमेरिकेला रवाना

ByMH LIVE NEWS

Mar 2, 2024
भारतीय डाळिंब समुद्रमार्गे अमेरिकेला रवाना

मुंबई दि. २ : निर्यातबंदी उठल्यानंतर प्रथमच भारतातून अमेरिकेला समुद्रमार्गे डाळिंब निघाली आहेत. वाशी येथील पणन मंडळाच्या विकिरण सुविधा केंद्रावरुन एकूण ४ हजार २५८ पेट्यांमधून १४ मे. टन डाळिंब भरलेला कंटेनर जवाहरलाल नेहरू पोर्ट टस्ट्र न्हावा-शेवा येथून समुद्रमार्गे अमेरिकेच्या नेवार्क बंदराकडे रवाना करण्यात आल्याची माहिती पणन विभागाने दिली आहे.

सन 2017-2018 मध्ये डाळिंबाच्या दाण्यात फळमाशीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे अमेरिकेने भारतातून डाळिंब आयातीस बंदी घातली होती.  त्यामुळे गेली 5-6 वर्षे अमेरिकेस डाळिंब निर्यात होऊ शकली नाही. ही निर्यातबंदी उठविण्याबाबत अपेडा व एन.पी.पी.ओ. भारत सरकार यांनी संयुक्तरीत्या अमेरिकेच्या कृषी विभागाशी चर्चा यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यानुसार सन 2022 पासून अमेरिकेने घातलेली निर्यात बंदी उठवली, मात्र त्यासाठी काही नियम व अटी घालण्यात आल्या. त्यामध्ये माईट वॉश, सोडियम हायपोक्लोराईड प्रक्रिया, वॉशिंग-ड्राईंग इ. प्रक्रिया करुन त्यांनी निश्चित केलेल्या मानकांनुसारच्या बॉक्समध्ये पॅकिंग करुन डाळिंबावर विकिरण प्रक्रिया करणे इत्यादी बाबींचा अंतर्भाव आहे. त्यानुसार अपेडा, भारत सरकार, एन.पी.पी.ओ., महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ व यु-लिंक अॅग्रीटेक (आय.एन.आय.) एक्सपोर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने अमेरिकेस डाळिंब निर्यातीचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार जुलै 2023 मध्ये प्रायोगिक तत्वावर डाळिंबाची पहिली शिपमेंट विमानमार्गे कृषी पणन मंडळाच्या वाशी, नवी मुंबई येथील विकिरण सुविधा केंद्रावरुन रवाना करण्यात आली. त्यानंतर जानेवारी 2024 मध्ये  महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम व सरव्यवस्थापक विनायक कोकरे यांच्या मार्गदर्शनाने डाळिंबाची आणखी एक शिपमेंट विमानमार्गे अमेरिकेला पाठवण्यात आली.

अमेरिकेचे निरीक्षक डॉ. लुईस हे कृषी पणन मंडळाच्या नवी मुंबईतील वाशी येथील विकिरण सुविधा केंद्रावर डाळींब तपासणीसाठी जानेवारी ते मार्च 2024 या हंगामासाठी कार्यरत आहेत. पहिल्या समुद्रमार्गे डाळिंब कंटेनरसाठी प्रथम यु-लिंक अॅग्रीटेक (आय.एन.आय.) यांच्या पॅकहाऊस येथे डाळिंबाची प्रतवारी करुन त्यावर निश्चित केलेल्या प्रणालीनुसार प्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर सदर डाळिंब 4 किलोच्या बॉक्समध्ये भरुन त्यावर विकिरण सुविधा केंद्रात अमेरिकन इन्‍स्पेक्टर आणि एन.पी.पी.ओ. यांच्या अधिकाऱ्यांच्या तपासणी अंती व मान्यतेनंतर डाळिंबावर विकिरण प्रक्रिया करण्यात आली. एकूण 4 हजार 258 बॉक्सेसमधून 14 मे. टन डाळिंबाचा कंटेनर दि. 28 फेब्रुवारी 2024 रोजी नाव्हा शेवा येथील जे.एन.पी.टी. वरुन समुद्रमार्गे अमेरिकेच्या नेवार्क या पोर्टसाठी रवाना करण्यात आला.

भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव राजेश अग्रवाल यांनी डाळिंबाच्या कंटेनरला हिरवा झेंडा दाखवला. याप्रसंगी अपेडाचे अध्यक्ष अभिषेक देव, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, अपेडाच्या महाप्रबंधक विनीता सुधांशु, अपेडा मुंबईचे उपमहाप्रबंधक प्रशांत वाघमारे, एन.पी.पी.ओ.चे अधिकारी डॉ. ब्रिजेश मिश्रा; अमेरिका दुतावासाचे मायकेल श्रुडर आणि एल्म्स रायनॉन, अमेरिकन निरीक्षक डॉ. लुईस फेलीसियानो, कृषि पणन मंडळाचे सहाय्यक सरव्यवस्थापक तथा विभाग प्रमुख सतिश वाघमोडे, व्यवस्थापक-निर्यात सतिश वराडे, निर्यातदार पंकज खंडेलवाल, एन.पी.पी.ओ., अपेडा व पणन मंडळाचे इतर अधिकारी व कर्मचारी सदरचे कंटेनर रवाना होतेवेळी उपस्थित होते. या निर्यातीनंतर अमेरिकेतील मोठी बाजारपेठ खुली होईल असा विश्वास श्री. अग्रवाल यांनी यावेळी व्यक्त केला.

भारतीय डाळिंबात कर्करोगापासून लढण्यासाठी लागणारे अॅन्टीऑक्सीडंट आहेत. त्वचेच्या विकारांवरील उपचारासाठी असणाऱ्या मार्गदर्शक डाएटमध्ये डाळिंबाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे अमेरिकेत डाळिंबाला मोठी मागणी आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया डाळिंबाच्या जातीपेक्षा भारतीय डाळिंबाच्या जातीला जास्त मागणी आहे. अमेरिकन मार्केटमध्ये भारतीय डाळिंबाचा बाजार हिस्सा वाढवण्यासाठी अपेडा, एन.पी.पी.ओ., कृषि पणन मंडळ आणि निर्यातदार यांच्यामार्फत यु.एस.डी.ए. – अफिस यांच्या सहकार्याने महत्वाची पावले उचलत आहेत. अमेरिकेस भारतातून पहिल्यांदाच समुद्रमार्गे डाळिंबाचा कंटेनर निर्यात करण्यात आल्याने ही एक महत्वाची मुहुर्तमेढ रोवली गेली असून भारतीय डाळिंबांनी अत्यंत शाश्वत व मोठी अशी अमेरिकन बाजारपेठ काबीज केली जाणार असल्याने डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असल्याचे पणन मंडळाचे कार्यकारी संचालक श्री. कदम यांनी सांगितले. तसेच या उपक्रमाचा अधिकाधिक लाभ निर्यादारांनी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed