दरम्यान, अपहरणकर्त्यांनी गुरुवारी (दि.२९) सुरुवातीस रूपचंद भागवत यास पैशांची व्यवस्था करण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यात सोडले. त्यानंतर दुपारच्या सत्रात विष्णू भागवत यांची सुटका केली. त्यानंतर संशयित पसार झाले. दरम्यान, गुन्हे शाखेच्या पथकाने एका संशयितास ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात रूपचंद रामचंद्र भागवत (३९, रा. गवंडगाव, ता. येवला) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित वेदांत येवला, प्रशांत, संभाजी, सुनील, राकेश सोनार व इतर चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
४ कोटी १० लाखांची मागणी
दरम्यान, माऊली क्रेडिट घोटाळ्यातील आरोपी असलेले तसेच शिवसेनेचे माजी पदाधिकारी आणि येवला पंचायत समितीचे माजी उपसभापती रुपचंद भागवत आणि विष्णू भागवत यांच्याकडे अपहरणकर्त्यांनी तब्बल ४ कोटी १० लाखांची मागणी केल्याची बाब समोर आली आहे. ही रक्कम घोटाळ्यात नुकसान झाल्याच्या बदल्यात होती का याबाबत अधिक तपास केला जात आहे.
तीन वेगवेगळ्या कार वापरल्या
संशयितांनी अपहरण करण्यासाठी तीन कार वापरल्याचे समोर आले आहे. त्यात एमएच ०४ डीएन ९६७७, पांढऱ्या रंगाची एक्सयूव्ही कार व संशयित राकेश सोनार याच्याकडील कार पोलीस तपासात समोर आली आहे. संशयितांनी भागवत बंधूंचे अपहरण करून ४ कोटी १० लाख रुपयांची मागणी केली. तसेच पैशांची तजवीज करण्यासाठी सोडून दिल्याचे उघड झाले आहे.
‘माऊली क्रेडिट’च्या माध्यमातून कोट्यवधींची फसवणूक
गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना गंडवल्याप्रकरणी श्री. माऊली मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑप सोसायटी व संकल्पसिद्धी प्रॉडक्ट प्रा. लि. कंपनीसह संचालक विष्णू भागवत व इतरांविरोधात शहरात गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी पोलिसांनी कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त केली असून, बँक खाती गोठवली आहेत. त्यामुळे फसवणूक झालेल्यांपैकीच काहींनी भागवत बंधूंचे अपहरण केल्याची चर्चा सध्या रंगली आहे.