• Mon. Nov 25th, 2024

    साखर कारखान्यांना मोठा दिलासा; अकरा हजार कोटी कर्जाची पुर्नबांधणी- केंद्राचा निर्णय

    साखर कारखान्यांना मोठा दिलासा; अकरा हजार कोटी कर्जाची पुर्नबांधणी- केंद्राचा निर्णय

    कोल्हापूर: केंद्र सरकारने साखर विकास निधीतून देशातील साखर कारखान्यांना दिलेल्या अकरा हजार कोटीपेक्षा अधिक कर्जाची पुर्नबांधणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यातील जादा व्याजाची आठशे कोटी रूपये माफ केल्याने कारखान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. साखर उद्योग अडचणीत आला असताना केंद्राने घेतलेल्या या निर्णयाने १७९ सहकारी कारखान्यांना नवसंजीवनी मिळणार असून यामध्ये बहुसंख्य कारखाने महाराष्ट्रातील आहेत.

    देशातील साखर कारखान्यांना केंद्रामार्फत साखर विकास निधी अंतर्गत कमी व्याज दरात कर्ज दिले जाते.मशिनरी अधुनिकीकरण,उस विकास,इथेनॅाल प्रकल्प,विस्तारीकरण,नवीन साखर कारखाने उभारणी यासाठी हे कर्ज दिले जाते.दोन टक्के कमी व्याज दराने दिल्या जाणाऱ्या या कर्जामुळे मागणीही मोठी असते.आतापर्यंत ११३३९ कोटी रूपयांचे कर्ज यानुसार केंद्राने केले आहे.पण गेल्या तीन चार वर्षात साखर उद्योग अडचणीत आल्याने हप्ते वसुलीवर परिणाम झाला आहे.

    नव्या निर्णयामुळे पहिली दोन वर्षे हप्ता न भरण्याची मुभा मिळणार आहे. याशिवाय हप्ते थकल्यामुळे जादा आकारणी केलेले ७९७ कोटी रूपयांची माफी मिळणार आहे. यातून आर्थिक अडचणीतील साखर कारखान्याना उभारी मिळणार आहे.

    – पी.जी. मेढे, साखर उद्येाग अभ्यासक


    या पार्श्वभूमीवर कारखान्यांना दिलेल्या कर्जाची पुर्नबांधणी करण्यात येणार आहे. सात वर्षात हे कर्ज फेडायचे आहे. यातील पहिली दोन वर्षे हप्ते न भरण्यास मुभा मिळणार आहे. यामुळे कारखान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या कारखाने आर्थिक अडचणीत असल्याने शेतकऱ्यांची बिले देणेही मुश्कील झाले आहे. कर्जाचा डोंगर वाढल्याने हप्ते भरणे अवघड झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्राने घेतलेल्या या निर्णयाने कारखान्यांना नवसंजीवनी मिळाली आहे. देशातील १७९ कारखान्यांमध्ये महाराष्ट्रातील कारखान्यांचा समावेश अधिक आहे

    आकडेवारी

    लाभार्थी साखर कारखाने- १७९

    एकूण कर्जवितरण- ११३३९ केाटी

    आतापर्यंतची वसुली- ८८५१ कोटी

    थकबाकी- २४८८ कोटी

    जादा व्याजाची रक्कम- ७९७ कोटी

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *