आगामी लोकसभा निवडणुकांचे बिगुल कोणत्याही क्षणी वाजण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून व महायुतीकडून जागावाटप व उमेदवारी संदर्भात मॅरेथॉन बैठका सुरू आहेत. राज्यात झालेल्या राजकीय भूकंपानंतर कोल्हापूर व हातकणंगलेचे दोन्ही विद्यमान खासदार शिंदे गटात सोबत महायुती मध्ये सामील झाले आहेत. तर सध्या भाजपने राज्यातील 23 जागांवर निवडणूक निरीक्षकांची यादी जाहीर केली असून यामधून कोल्हापूर व हातकणंगलेची जागा वगळण्यात आली आहे. यामुळे या दोन्ही जागा शिवसेनेकडे राहणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यामुळे या दोन्ही जागेवरील उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर पडली आहे.
हाडाची काडं आणि रक्ताचं पाणी करावं लागेल
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून मोर्चेबांधणीला सुरुवात करण्यात आली आहे. राज्यात झालेल्या राजकीय भूकंपानंतर राज्यात राजकीय समीकरणं बदलली आहेत. याचे पडसाद जिल्हास्तरावरील राजकारणात देखील दिसून येऊ लागले आहेत. २०१९ साली ज्यांच्या विरोधात लोकसभा लढली ते आता सोबत आहेत. तर ज्यांच्या सोबत निवडणूक लढले ते आता विरोधात उभे आहेत.
पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचा जिल्हा असलेल्या कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात देखील काही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्याचे दोन्ही विद्यमान खासदार हे शिवसेना शिंदे गटासोबत गेल्याने या दोन्ही मतदारसंघावर शिवसेनेने आपला दावा सांगितला आहे. मात्र भाजप एका जागेची मागणी करत आहे. जागावाटपात ही जागा कोणालाही गेली तरी मात्र या जागेवरील दोन्ही उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी ही महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर देण्यात आली आहे.
श्रीमंत शाहू महाराजांनी निवडणुकीसाठी उभे राहू नये
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी देण्याची तयारी करत आहे. जरी शाहू महाराजांना उमेदवारी मिळाली तरी त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी हे काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या खांद्यावर असणार आहे. तर महायुती पुन्हा विद्यमान खासदार संजय मंडलिक यांनाच उमेदवारी देण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने संजय मंडलिक यांनी मतदारसंघात दौरे आणि गाठीभेटीही सुरू केल्या आहे. यामुळे या मतदारसंघात पुरोगामी विचार विरुद्ध हिंदुत्ववादी विचार आणि सतेज पाटील विरुद्ध हसन व मुश्रीफ असा सामना पाहायला मिळण्याची शक्यता निर्माण होत आहे.
कोल्हापूर जिल्ह्याला छत्रपती घराण्याविषयी मोठा आदर आहे. छत्रपती घराण्याला आणि शाहू महाराजांना मानणारा मोठा वर्ग कोल्हापुरात आहे. यामुळे शाहू महाराजांना उमेदवारी मिळाली तर ही निवडणूक काँटे की टक्कर होईल, यामुळे मंत्री हसन मुश्रीफ यांनी श्रीमंत शाहू महाराजांनी निवडणुकीसाठी उभे राहू नये असं आम्हा सर्वांना वाटतं असं मुश्रीफ म्हणाले. तसेच ते आमच्या सर्वांचे आदर्श आहेत. ही लोकशाही आहे मात्र त्यांनी राजकारणात यावं किंवा न यावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. श्रीमंत शाहू महाराज एक आदर्श स्थान असल्यामुळे ते स्थान तसंच रहावे यासाठी त्यांनी निवडणूक लढवू नये, असे मुश्रीफ म्हणाले आहेत.