टाटा मेमोरियल रुग्णालयातील कॅन्सर सर्जन डॉ. राजेंद्र बडवे यांनी या संशोधनाबाबत अधिक माहिती दिली. या प्रयोगासाठी कॅन्सरच्या पेशी उंदरांच्या शरीरात सोडण्यात आल्या, त्यामुळे उंदरांमध्ये ट्यूमर विकसित झाला. त्यानंतर या उंदरांवर रेडिएशन, केमोथेरपी आणि शस्त्रक्रिया हे उपचार करण्यात आले. या अभ्यासात असे दिसून आले की, मरणपंथाला लागलेल्या कॅन्सर पेशींमधून क्रोमाटिन (chromatin) हे घटक बाहेर सोडले जातात, ते रक्तप्रवाहातून निरोगी पेशींपर्यंत पोहोचतात आणि त्यांचे रूपांत कॅन्सर पेशींमध्ये करतात. यावर उपाय शोधून काढण्यासाठी, डॉक्टरांनी रिसवरट्रॉल (resveratrol) आणि कॉपर (copper) या घटकांचा समावेश असलेल्या (R+Cu) या प्रो-ऑक्सिडंट गोळ्या या उंदरांना दिल्या. या R+Cu गोळ्या ऑक्सिजन रॅडिकलची निर्मिती करतात, जे क्रोमाटिन घटकांना नष्ट करतात. R+Cu गोळ्या तोंडावाटे घेतल्या, तर त्या पोटामध्ये ऑक्सिजन रॅडिकल्सची निर्मिती करतात, जे तातडीने रक्तप्रवाहात शोषून घेतले जाते. या प्रक्रियेमुळे कॅन्सर पेशींचा (metastases) प्रसार थांबतो आणि केमोथेरपीचा विषारीपणा (toxicity) कमी होतो.
संशोधकांनी या शोधाला ‘R+Cuची जादू’ (Magic of R+Cu) असे संबोधले आहे. ही टॅबलेट कॅन्सच्या उपचारांचे दुष्परिणाम ५० टक्क्यांनी कमी करू शकेल, तसेच कॅन्सर पुन्हा होण्याची शक्यता ३० टक्क्यांनी कमी करेल, अशी अपेक्षा आहे. स्वादुपिंड, फुप्फुस आणि मुखासंबंधी कॅन्सरवरील उपचारांमध्ये या नवीन संशोधनाने आशा निर्माण केली आहे.
एफएसएसएआयच्या मान्यतेची प्रतीक्षा
या औषधाला अद्याप अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाच्या (Food Security and Standards Authority of India- FSSAI) मान्यतेची प्रतीक्षा आहे. ही मान्यता मिळाल्यानंतर, जून- जुलै महिन्यापासून हे औषध बाजारात अवघ्या १०० रुपये किंमतीत उपलब्ध होऊ शकणार आहे. या औषधाच्या मानवी चाचण्या सुरू आहेत. याचे निष्कर्ष येण्यासाठी पाच वर्षांचा कालावधी लागेल, असा अंदाज आहे.
रुग्णांवरील आर्थिक भार कमी होणारया औषधाच्या संशोधन प्रक्रियेमध्ये प्रारंभी अनेक शंकाकुशंका तसेच आव्हाने होती. मात्र या औषधाच्या यशामुळे कॅन्सर उपचारांमध्ये महत्त्वाची प्रगती झाली आहे. ही गोळी स्वस्तात आणि सहज उपलब्ध असेल, त्यामुळे कॅन्सरच्या उपचारांच्या परिणामांमध्ये अधिक सुधारणा करण्यासाठी तसेच रुग्णांवरील आर्थिक भार कमी करण्याच्या दृष्टीने ही गोळी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल, याकडे डॉ. राजेंद्र बडवे यांनी लक्ष वेधले.