आगामी काळात बँक पुन्हा गतीने भरारी घेईल, असा विश्वास बँकेचे अध्यक्ष डॉ. आदित्य सुभाषचंद्र सारडा यांनी व्यक्त केला. निर्बंध हटवल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन ठेवीदार आणि खातेदारांच्या विश्वासासह पारदर्शक कारभाराची पावती मिळाल्याची भावना सारडा यांनी व्यक्त केली.
सध्या बीड जिल्ह्यातील सहकार क्षेत्र पाहायला गेलं तर अत्यंत गोंधळलेल्या अवस्थेत आहे, कारण बीड जिल्ह्यातील बहुतांश बँक पतसंस्था या वादात किंवा बुडीत निघाल्या आहेत. बीड जिल्ह्यातील हजारो ठेवीदारांचे पैसे बुडल्याच्या अफवा पसरल्याने गेल्या सहा महिन्यांपासून जिल्ह्यातील ठेवीदार हे आपल्या पैशांसाठी झगडत आहेत.
यामध्ये नामांकित असलेल्या बँकाही सामील असल्याने ठेवीदारांतील गोंधळ मोठ्या प्रमाणात वाढला होता. बीड जिल्ह्याला पहिला धक्का बसला होता तो म्हणजे द्वारकादास मंत्री बँकेवर आरबीआयने केलेल्या कारवाईमुळे.
९ मार्च २०२२ रोजी बँकेच्या तक्रारी झाल्याने आरबीआयने सर्व प्रकारचे निर्बंध लावले होते. त्यानंतर जुने संचालक मंडळ कमी करून बँकेवर प्रशासक नियुक्त केले. २१ ऑक्टोबर २०२२ रोजी बँकेचा परवाना रद्द करण्यासाठी नोटीस देण्यात आली होती. मात्र या सगळ्या कारवाईमुळे बीड जिल्ह्यातील आणि बँकेतील लाखो ठेवीदारांवर आर्थिक संकट आलं होतं.
या काळात अनेक ठेवीदारांनी बँकेचे उंबरे झिजवत आपल्या ठेवी परत मिळवण्यासाठी मोठा संघर्ष केला, मात्र आता तो संघर्ष संपला आहे. आरबीआय ने केलेली कारवाई आणि द्वारकादास मंत्री बँकेवरील निर्बंध हे हटवले आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्यातील ठेवीदारांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. हे निर्बंध निघताच बँक अध्यक्ष, संचालक आणि कर्मचाऱ्यांनी मोठा जल्लोष व्यक्त केला आहे. बँकेचे अध्यक्ष आदित्य सारडा यांनी थेट पत्रकार परिषद घेत ही आनंदाची गोष्ट पत्रकारांच्याद्वारे ठेवीदारांपर्यंत पोहोचवली आहे. यामुळे आता नक्कीच ठेवीदारांच्या सर्व ठेवी आणि बँक व्यवहार हे सुरळीत होणार असल्याचं आश्वासन आदित्य सारडा यांनी दिले आहे.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
बँकेवर आरबीआयने कारवाई केल्यानंतरही अनेक वर्ष बँकेवर प्रशासक राहिलेली आणि त्यानंतर निर्बंध उठवलेली ही भारतातली पहिली बँक ठरली आहे. तरी यापुढेही बँक ही ग्राहकांसाठी विश्वासदायी कामगिरी करून पुन्हा एकदा पूर्वपदावर आणण्याचा मानस द्वारकादास मंत्री बँकेचे अध्यक्ष आदित्य सारडा यांनी व्यक्त केला आहे.