उद्योग वृद्धीसाठी व द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत करण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन
मुंबई, दि. २७ : यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरमने (USISPF) राज्यात उद्योग वृद्धीसाठी व द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत करण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
मंत्रालयात यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरमच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री श्री शिंदे यांची भेट घेतली. यावेळी खासदार मिलिंद देवरा, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव विकास खारगे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मा यांच्यासह यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरमच्या शिष्टमंडळाचे अध्यक्ष जाँन चेंबर्स, डॉ. मुकेश अघी यांच्यासह अधिकारी होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर आहे. पायाभूत सुविधांचा विकास, कृषी, आरोग्य सेवा, शिक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पर्यटन या क्षेत्रात प्रचंड क्षमता व संधी असल्याचे सांगून महाराष्ट्र हे भारताचे आर्थिक शक्तिस्थान असल्याचे सांगितले.
आज मराठी भाषा गौरव दिन साजरा होत आहे. मराठी भाषा ही प्राचीन आणि ऐतिहासिक आहे.१० कोटीहून अधिक लोकं व्यवहारात मराठी भाषा वापरतात. जागत सर्वात जास्त बोलली जाणारी १६ वी भाषा आहे. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देवून आज त्यांनी मराठी भाषेतूनच संवाद साधला. मराठी भाषांतर करून खासदार मिलिंद देवरा यांनी शिष्टमंडळास सांगितले.
प्रधानमंत्री मोदींनी भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.त्यांच्या स्वप्नाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही महाराष्ट्राला १ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे स्वप्न साकार करण्यासाठी सर्व अमेरिकन कंपन्या आम्हाला त्यांच्या गुंतवणुकीत मदत करत आहेत. युएसआयएसपीएफ (USISPF) ने ही प्रक्रिया सुलभ केली असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
व्यवसाय करण्याच्या सुलभतेसाठी, आम्ही सर्व नवीन कंपन्यांना सिंगल विंडो क्लिअरन्स सुरू केले आहे. नवीन गुंतवणूकदारांना रेड कार्पेट देत आहोत.
आपल्या अनेक सदस्य कंपन्या महाराष्ट्रात आधीच कार्यरत आहेत. ज्या यूएस कंपन्या येथे गुंतवणूक करतील ते उत्पादन किंवा सेवा क्षेत्र, आमच्या इको-सिस्टमसाठी सोयीस्कर राहील. अशी खात्री आहे. आपले शासन उद्योग-समर्थक आणि विकासाप्रती, सर्वसमावेशक, सहभागी आणि व्यावहारिक आहे.आमच्याकडे नवीन प्रकल्पांसाठी कुशल मनुष्यबळ, पायाभूत सुविधा आणि मुबलक जमीन आहे.त्यामुळेच दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये आम्ही ४६ अब्ज डॉलर्सचे सामंजस्य करार केले आहेत. आपण येथे हॉलिवूडमधील गुंतवणूक बॉलिवूडमध्ये करावी, राज्यात विविध उद्योग आणावेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
०००
राजू धोत्रे/विसंअ/