• Sat. Sep 21st, 2024
राज्यात आणखी चार पुस्तकांची गावे १ मेपर्यंत प्रत्यक्षात, पुस्तक निवडीसाठी समितीचे काम सुरु

मुंबई : महाराष्ट्रातील भिलार या पुस्तकाच्या गावानंतर इतर महसुली विभागांत पुस्तकांची गावे प्रत्यक्षात येण्याची घोषणा झाल्यानंतर दीर्घ काळ हा प्रकल्प रखडला. मात्र या प्रकल्पाला आता वेग आला असून १ मेपर्यंत चार गावे प्रत्यक्षात येण्याची चिन्हे दिसत आहे. राज्य मराठी विकास संस्थेकडून पुस्तक निवडीसाठी समितीही गठीत झाल्याचे सांगण्यात येत आहे.

औरंगाबाद विभागात वेरुळ येथे, नागपूर विभागात नवेगाव बांध येथे, कोकण विभागात पोंभुर्ले येथे आणि पुणे विभागात अंकलखोप (औंदुंबर) येथे पुस्तकांच्या गावाचा विस्तार करण्याचा शासन निर्णय २५ मार्च २०२२ रोजी जाहीर झाला. त्यानंतर गेल्या वर्षीही ही प्रक्रिया रखडली होती. त्यामुळे इतर विभागांमधील पुस्तकांच्या गावाबद्दल सातत्याने विचारणा होत होती. यासोबतच अमळनेर येथील ९७व्या साहित्य संमेलनात मराठी भाषामंत्री दीपक केसरकर यांनी अमळनेर येथे पुस्तकांचे गाव तयार करण्याचे आश्वासन दिल्याने आधीच्या पुस्तकांच्या गावाचे काय झाले, असा प्रश्न निर्माण झाला होता.

मार्च २०२२मधील शासन निर्णयानुसार निवडलेल्या गावांसाठी आता पुस्तक निवड समिती गठीत झाली असून, पुस्तके निवडल्यानंतर या प्रक्रियेला अधिक वेग येणार असल्याची माहिती राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. शामकांत देवरे यांनी दिली. विषयानुरूप साहित्याची निवड होत असून गावांमध्ये कोणत्या घरांमध्ये दालने निर्माण करण्यात येणार आहेत याचा निर्णय झाल्याचे त्यांनी सांगितले. भिलारप्रमाणेच ही दालनेही रंगवली जातील. पुस्तक निवड समितीचे काम येत्या सुमारे १५ दिवसांमध्ये संपण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुस्तकांच्या गावाच्या प्रकल्पासाठी पुस्तक खरेदीची प्रक्रियाही सुरू होईल.
मुंबईभर मराठीचा जागर, ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या आवाहनानंतर सर्वत्र विविध कार्यक्रमांच्या आयोजनाचा उत्साह
‘कवितांचे गाव’

पुस्तकांच्या गावासोबतच ‘कवितांचे गाव’ हा प्रकल्पही राबवण्यात येणार आहे. यासंदर्भात शासन निर्णय अद्याप काढण्यात आलेला नाही. मात्र, मंगेश पाडगावकरांचे गाव असलेल्या वेंगुर्ला येथील उभा दांडा येथे कवितांचे गाव हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे आश्वासन केसरकर यांनी दिले होते. त्यानुसार या गावासाठी येणाऱ्या खर्चाचा अंदाज घेण्यात आला असून, पुढील प्रक्रियाही लवकरच होईल असा अंदाज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed