• Sat. Sep 21st, 2024
इतवारी रेल्वे स्टेशन आता या नावाने ओळखले जाईल; नितीन गडकरी यांच्या हस्ते नामकरण

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी देशभरातील १,५०० रेल्वे सबवे (RUB) चे उद्घाटन केले आणि अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत ५५४ विकास प्रकल्पांचे आभासी पद्धतीने उद्घाटन केले. या अंतर्गत नागपुरातील इतवारी रेल्वे स्टेशन चे अधिकरीक नाव बदलून ‘ नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी रेल्वे स्टेशन ‘ असे ठेवण्यात आले.

नागपुरातील इतवारी रेल्वे स्थानकावर मध्य रेल्वे आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नितीन गडकरी यांच्या हस्ते इतवारी रेल्वे स्थानकाचे ‘नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी रेल्वे स्थानक’ असे नामकरण करण्यात आले. यावेळी आमदार कृष्णा खोपडे, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या डीआरएम नमिता त्रिपाठी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

दक्षिण पुर्व मध्य रेल्वे नागपूर झोनमधील नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी रेल्वे स्थानकावर आधुनिक प्रवासी सुविधांचा विकास प्रस्तावित आहे, ज्याची पायाभरणी आज पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आली. या झोनमध्ये १९ ओव्हरब्रिज/अंडरपासचे कामही प्रगतीपथावर आहे. इतवारी रेल्वे स्थानकावर ‘अमृत भारत स्थानक’ योजनेंतर्गत १२.३९ कोटी रुपये खर्चून प्रदक्षिणा क्षेत्राचा विकास, उद्यान आणि लँडस्केपिंग, स्थानकाच्या इमारतीचे नवीन आकर्षक स्वरूप, मोठी जागा आणि कार पार्किंगसाठी सुविधा,हाय मास्ट लाइट्स, पेंटिंग्ज आणि स्थानिक कलाकृती, भुवनेश्वर मॉडेल टॉयलेट आणि सीसीटीव्ही यांसारखी पुनर्विकासाची कामे केली जातील.

मध्य रेल्वेने नागपूर विभागात १३५.४४ कोटी रुपये खर्चून ३६ भुयारी मार्ग बांधले आहेत. अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या १५ रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला असून तीन रेल्वे स्थानकांचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित १२ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. इतवारी रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी १२.३९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed