चंद्रपूर, दि. 26 : शहरात सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासन पूर्णपणे प्रयत्नशील आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी पोलिसांप्रमाणेच नागरिकांचाही सहभाग महत्त्वाचा असून कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत चंद्रपूर जिल्हा राज्यात अग्रेसर राहावा, अशी अपेक्षा राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. पोलीस परेड ग्राउंड येथे आयोजित पोलीस एक्स्पो कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाला आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी, शिक्षणाधिकारी(माध्य.) कल्पना चव्हाण आदी उपस्थित होते
समाजामध्ये पोलीस आदर्श नागरिक असून समाजाचे रक्षण करण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असते, असे सांगून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, पोलिसांप्रमाणेच कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी नागरिकांची देखील आहे. आदर्श गाव होण्यासाठी तसेच गाव पातळीवर किंवा त्यांच्या कार्यक्षेत्रातील गुन्हे रोखण्यासाठी पोलीस पाटील हा महत्त्वाचा घटक आहे. समाज व पोलीस पाटील यांच्या समन्वयातून महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी चंद्रपूर जिल्हा कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत अग्रेसर व्हावा, इतरांनी या जिल्ह्याच्या प्रशासनाचा हेवा करावा, पोलीस विभागाचे कौतुक करावे, असे काम जिल्ह्यात व्हावे. नवचैतन्य प्रदर्शनीतून गावातील प्रत्येक नागरिकांपर्यंत चैतन्य पोहोचवायचे आहे. पोलीस विभागाला भौतिक संसाधनाची आवश्यकता असल्यास त्या सर्व संसाधनासाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे ते म्हणाले.
पुढे बोलतांना श्री. मुनगंटीवार म्हणाले, सर्वंकष समाजाच्या प्रगतीसाठी एकत्र येऊन सामूहिक भावनेने विचार करण्याची आवश्यकता आहे. कायद्याची अंमलबजावणी कठोरपणे करावी. जेणेकरून, कायदा तोडण्याची हिंमत कोणीही करणार नाही. त्यासाठी जिल्ह्यात व्यवस्था उभी करण्याची आवश्यकता आहे. या प्रदर्शनीच्या माध्यमातून व्यसनमुक्ती संदर्भात जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. जिल्ह्यात दारूबंदी असताना अपघातात 131 लोकांचा तर दारूबंदी उठविल्यानंतर 450 लोकांचा मृत्यू झाला. व्यसनमुक्तीचा संकल्प केला मात्र, संकल्प करून पुढे न जाता व्यसनमुक्तीची चळवळ जिल्ह्यात उभी करावी. नशा ही दारू, व्यसनाची नसावी तर ती उत्तम गुणांची असावी, असेही ते म्हणाले.
अर्थमंत्री असताना पोलीस पाटील यांचे मानधन वाढवून दिले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे पर्यंत त्यांच्या असलेल्या मागण्या पोहोचविण्यात येईल. पोलीस पाटील यांनी जनतेचे विषय घेऊन आपला जिल्हा महाराष्ट्रात उत्तम व्हावा, या दृष्टीने प्रयत्न करावे, असेही ते म्हणाले. यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नवचैतन्य प्रदर्शनीच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन यांचे कौतुक केले
पोलीस पाटील मार्गदर्शिकेचे अनावरण : पोलीस प्रशासनाकडून तयार करण्यात आलेल्या पोलीस पाटील मार्गदर्शकेचे अनावरण पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पार पडले.
०००