सातारा दि.26 : लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी तरुणांचा सहभाग महत्वाचा आहे. सातारा जिल्ह्यातील महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थींनीची चांगल्या प्रमाणात नोंदणी झाली आहे. नवमतदारांनी येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत मतदान करावे. महाविद्यालयांनीही यासाठी जनजागृतीच्या माध्यमातून विशेष प्रयत्न करावेत, असे आवाहन मुख्यनिवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त श्री. देशपांडे यांनी विविध महाविद्यालयांच्या प्राचार्यांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) अर्चना वाघमळे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शबनम मुजावर यांच्यासह विविध महाविद्यालयांचे प्राचार्य उपस्थित होते.
महाविद्यालयातील नव मतदारांनी मतदान करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करावे, असे सांगून मुख्य निवडणूक आयुक्त श्री. देशपांडे म्हणाले, निवडणूक प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा सहभाग घेणार असून मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर विद्यार्थ्यांचा स्वयंसेवक म्हणून उपयोग करुन घेण्यात येईल. त्याचबरोबर मत मोजणीच्या दिवशीही त्यांचा सहभाग घेण्यात येईल. यामुळे निवडणूक प्रक्रियेचे त्यांना जवळून अवलोकन करता येईल.
मतदनाच्या एक दोन दिवस अगोदर महाविद्यालयातील विद्यार्थी गृह भेटी देऊन आमचे भविष्य तुच्या हातात आहे मतदान करा, असे आवाहन करतील. त्याचबरोबर मतदानाचा टक्का वाढावा यासाठी विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे गावोगावी जनजागृती करावी. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या नोंदणीच्या कामात नेमण्यात आलेल्या विद्यार्थ्यांनी चांगली कामे केले आहेत. लोकशाही आणखीन समृद्ध करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महाविद्यालयातील तरुणांना वेळोवेळी मार्गदर्शन करावे, असेही मुख्य निवडणूक आयुक्त श्री. देशपांडे यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मतदार नोंदणीत उत्कृष्ट काम करणाऱ्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला.
000