• Sun. Nov 17th, 2024

    आर्थिक नियोजन, शिस्त आणि होतकरुंना कर्जपुरवठा ही बॅंकांची बलस्थाने- उपमुख्यमंत्री अजित पवार

    ByMH LIVE NEWS

    Feb 23, 2024
    आर्थिक नियोजन, शिस्त आणि होतकरुंना कर्जपुरवठा ही बॅंकांची बलस्थाने- उपमुख्यमंत्री अजित पवार

    छत्रपती संभाजीनगर दि.२३(जिमाका)- सहकारी बॅंक चालवण्यासाठी संचालक मंडळाने सतत सजग राहणे आवश्यक आहे. बॅंकांना आर्थिक शिस्त लागावी म्हणून रिजर्व बॅंकेने कायदेही कडक केले आहेत. त्यामुळे आर्थिक नियोजन, शिस्त आणि होतकरुंना कर्जपुरवठा ही बॅंकांची बलस्थाने आहेत,असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे केले.

    आंबाजोगाई पिपल्स कॉ.ऑप बॅंकेच्या १७ व्या व छत्रपती संभाजीनगर येथील तिसऱ्या शाखेचे उद्घाटन श्री. पवार यांच्या हस्ते करण्यात आले. खासदार सुनिल तटकरे,आ. सतिष चव्हाण, आ. विक्रम काळे, आ. प्रदीप जयस्वाल , विजया रहाटकर, बॅंकेचे चेअरमन राजकिशोर मोदी तसेच संचालक मंडळ सदस्य व अन्य मान्यवर उपस्थित होते.

    आपल्या संबोधनात श्री. पवार म्हणाले की, रिजर्व बॅंकेचे नियम हे बॅंकांना आर्थिक शिस्त लावण्यासाठीच आहेत. संचालकांचे थोडेही दुर्लक्ष करणे हे संस्था डबघाईला जाण्याचे कारण ठरू शकते.  लोकांच्या ठेवी सुरक्षित ठेवणं, पतपुरवठा करणं आणि कर्ज वसुली करणं हे संस्था उत्तम चालल्याचे लक्षण आहे. आंबाजोगाई पिपल्स को ऑप बॅंक यादृष्टिने उत्तम कार्य करीत असल्याचे दिसून येते असेही श्री. पवार यांनी सांगितले व संचालक मंडळाचे अभिनंदन केले.संगणकीकरणामुळे बॅंकींग क्षेत्रात आमुलाग्र बदल झाला असून ग्राहकांना उत्तम सेवा देण्यात बॅंकांमध्येही स्पर्धा निर्माण झाली आहे हे एक चांगले लक्षण असल्याचे नमूद करुन त्यांनी बॅंकेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. खा. तटकरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बॅंकेच्या प्रगतीची वाखाणणी केली.

    ०००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed