• Sun. Nov 17th, 2024

    प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग भवन उभारणार -उपमुख्यमंत्री अजित पवार

    ByMH LIVE NEWS

    Feb 23, 2024
    प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग भवन उभारणार -उपमुख्यमंत्री अजित पवार

    छत्रपती संभाजीनगर, दि.२३ (जिमाका): राज्यात एकूण लोकसंख्येच्या ४ टक्के व्यक्ति ह्या दिव्यांग आहेत. त्यांच्या विशेष गरजा लक्षात घेऊन प्रत्येक जिल्हा मुख्यालयाला सुसज्ज दिव्यांग भवन उभारण्यात येईल. त्याची सुरुवात विभागीय मुख्यालयांपासून होईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे केली.

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेत आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक पार पडली. बैठकीस रोहयो व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे, गृहनिर्माण व इतर मागासवर्ग कल्याण मंत्री अतुल सावे, आ. रमेश बोरनारे, आ. सतिष चव्हाण, विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ तसेच सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

    बैठकीच्या प्रारंभी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहण्यासाठी दोन मिनिटे मौन पाळण्यात आले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ यांनी जिल्हा वार्षिक योजनेच्या खर्चाचे सादरीकरण केले. मुख्यकार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी जिल्हा परिषदेच्या उपक्रमांचे तसेच मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी मनपा मार्फत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांच्या माहितीचे सादरीकरण केले. पोलीस विभागामार्फत होत असलेल्या अद्यावतीकरणाच्या उपाययोजनांबाबत पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी माहिती दिली.

    उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, मागणी केल्यानुसार नियतव्यय मंजूर केला आहे. त्यानुसार सर्व मंजूर निधी खर्च करावा. निधी खर्च करण्याचा प्राधान्यक्रम ठरवा म्हणजे महत्त्वाची कामे पूर्ण होतील.  येत्या काळात पाणीपुरवठा योजना व दुष्काळी उपाययोजनांचेही नियोजन करण्यात यावे.

    ते पुढे म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या शाळांना कुंपण असले पाहिजे त्यामुळे मुलांना शालेय वातावरण मिळते. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बळकटीकरणही हाती घ्यावे. जेणे करुन ग्रामिण भागात आरोग्य सुविधा नागरिकांना मिळायला हव्या.

    महानगरपालिका साकारत असलेले दिव्यांग भवनाचे सादरीकरण पाहून श्री. पवार म्हणाले की, आपल्या राज्यात लोकसंख्येच्या ४ टक्के दिव्यांगांचे प्रमाण आहे. या दिव्यांगांसाठी सर्व सुविधांनी सुसज्ज दिव्यांग भवन प्रत्येक जिल्ह्यात उभारले जावे. त्यासाठी आराखडा व साधनांबाबत अद्यावत माहितीसह प्रस्ताव तयार करावे. प्रत्येक जिल्ह्यात असे भवन उभारतांना प्रारंभी  विभागीय मुख्यालयी दिव्यांग भवन उभारण्यात येतील,असेही श्री. पवार यांनी स्पष्ट केले.

    क्रीडा विद्यापीठ उभारण्यासाठी सर्वसमावेशक समिती तयार करावी. त्यात पालकमंत्री, मंत्री महोदय तसेच क्रीडा क्षेत्रातील तज्ज्ञ, माजी खेळाडूंचा समावेश करावा, अशा सुचनाही श्री. पवार यांनी केली. याच बैठकीत जिल्हा परिषदेच्या इमारत बांधकामास सुप्रमा देण्याबाबतही ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी झालेल्या चर्चेत पालकमंत्री संदिपान भुमरे, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, आ. रमेश बोरनारे, आ. सतिष चव्हाण यांनीही सहभाग घेतला.

    बैठकीचे सूत्रसंचालन अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे यांनी केले तर जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ यांनी आभार मानले.

    ०००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed