• Sun. Nov 17th, 2024

    मुंबई उपनगर जिल्ह्यात महासंस्कृती महोत्सवांतर्गत उद्यापासून बौद्ध आणि शबरी महोत्सव – पालकमंत्री मंगल प्रभात लोढा

    ByMH LIVE NEWS

    Feb 23, 2024
    मुंबई उपनगर जिल्ह्यात महासंस्कृती महोत्सवांतर्गत उद्यापासून बौद्ध आणि शबरी महोत्सव – पालकमंत्री मंगल प्रभात लोढा

    मुंबई, दि. २३ : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘महासंस्कृती महोत्सव २०२४’ अंतर्गत राज्यभर विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री  मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून दि. २४ आणि २५ फेब्रुवारी रोजी  मुंबई उपनगर जिल्ह्यात ‘बौद्ध महोत्सव’ तर दि. २७ आणि २८ फेब्रुवारी  रोजी  ‘शबरी  महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. पालकमंत्री श्री. लोढा यांनी आज मंत्रालयात विधिमंडळ वार्ताहर कक्ष येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

    यावेळी डॉ. भदंत राहुल बोधी, सामाजिक कार्यकर्ते शरद कांबळे, नितीन मोरे, अरविंद निकाळजे उपस्थित होते.

    सर्वोदय महाबुद्ध विहार, टिळक नगर, चेंबूर येथे बौद्ध महोत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम २४ आणि २५ फेब्रुवारी रोजी होणार असून, त्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आणि डॉ. भदंत राहुल बोधी यांची विशेष उपस्थिती असणार आहे.  हा कार्यक्रम भिक्खू संघ युनायटेड बुद्धिस्ट मिशनच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे.

    मंत्री श्री.लोढा म्हणाले की,  आपल्या भूमीला भगवान गौतम बुद्धांच्या विचारांचा अमोघ वारसा आहे. त्याचप्रमाणे आदिवासी बांधवांच्या संस्कृतीची देणगी आहे. प्रगतीच्या मार्गावर सर्वांना सोबत घेऊन पुढे जायचे असेल, तर आपला वारसा आणि संस्कृती जपणे अतिशय महत्वाचे ठरते. त्याच अनुषंगाने आम्ही या महोत्सवाचे आयोजन केले आहे. बौद्ध बांधवांनी आणि आदिवासी बांधवांनी नेहमीच आपल्या योगदानाने समाजाच्या प्रगतीसाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करण्याची ही संधी असून, जास्तीत जास्त नागरिकांनी या महोत्सवामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन मंत्री श्री.लोढा यांनी केले.”

    शनिवार दिनांक २४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता केंद्रीय मंत्री रामदास आठवले, पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, डॉ. भदंत राहुल बोधी यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. त्यानंतर भीम गीते स्पर्धा, परिसंवाद, संविधान रॅली, धम्मपद भीम गीते यासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होईल. २५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता कार्यक्रमाची सुरुवात होणार असून, या दिवशी सामाजिक संस्था परिचय, कला अविष्कार, महिला मेळावा, धम्म सन्मान आणि शाहीरी जलसा असे कार्यक्रम होतील.

    त्याचप्रमाणे २७ आणि २८ फेब्रुवारी रोजी गोरेगाव (पू.) येथील आरे कॉलनीमधील आदर्शनगर येथे शबरी महोत्सवाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात आदिवासी संस्कृतीचे विविध पैलू उलगडले जातील. त्यासाठी प्रदर्शने, वैदू संमेलन, जनजागृतीपर नृत्यांचे सादरीकरण, जनजाती पूजा मांडणी, महिला संमेलन यासारख्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. हा कार्यक्रम वनवासी कल्याण आश्रमाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे.

    ०००

    संध्या गरवारे/विसंअ

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed