मुले पालकांशी मोकळेपणाने संवाद साधू शकत नाहीत, मात्र समुपदेशनाच्या वेळी विद्यार्थी मोकळेपणाने यासंदर्भात सांगतात. परीक्षेच्यावेळी ज्या मुलांना अतिरिक्त ताण येतो त्यांना आम्ही केवळ सल्ला देत नाही तर समवयस्क मित्राने अशावेळी काय केले असते, असा प्रश्न विचारतो. क्षणभर डोळे बंद करून त्यावेळी त्या परिस्थितीमध्ये उत्तम मध्यममार्ग काय निघू शकेल, याचा विचार करायचा. दडपणाची श्रेणी कोणती आहे याचाही विचार करण्याचा सल्ला आम्ही विद्यार्थ्यांना देतो.
स्वतःवर विश्वास ठेवा
परीक्षेची तयारी करताना स्वत:वर विश्वास ठेवायला हवा. अभ्यास करत असताना स्वतःला वेळ देणे, काही मिनिटांचा सरावाच्या वेळी स्वतःला ब्रेक देणेही गरजेचे असते. ताणतणावावर मात करण्यासाठी संवाद साधणेही तितकेच महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या जवळच्या माणसांशी तसेच मित्रमंडळींशी मोकळेपणाने बोलायला हवे. तसे केल्यामुळे त्यांना दिलासा मिळतो. खूप तणावाच्या मनस्थितीमध्ये श्वासावर लक्ष केंद्रित करणे, हा देखील तितकाच महत्त्वाचा उपाय सांगितला जातो. दीर्घ श्वास घेणे व सोडण्याच्या प्रक्रियेमध्ये विचारांवर लक्ष केंद्रित होते. दडपण कमी होते.
मुलांचा कल लक्षात घ्या
समुपदेशक माधव पवार यांनी काही विद्यार्थ्यांना पालक परीक्षेच्या वेळी घरी रजा घेऊन राहतात. सतत सूचना करत राहतात, अशीही तक्रार विद्यार्थी करतात. वर्षभर मुलांनी चांगला अभ्यास केला असेल तर आपल्या पाल्यावर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. विद्यार्थी गुणी व मेहनती असेल तर त्याला त्या दिवसात सोबतीची गरज आहे का, हे पालकांनी विचारणेही तितकेच गरजेचे आहे. ही सोबत लादू नये, ती सहजपणे व्हायला हवे असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना ताण येत असेल तर समुपदेशकांच्या तसेच हेल्पलाइनच्या सुविधा उपलब्ध असतात. ती मदत योग्यवेळी घ्यायला हवी, असाही आग्रह त्यांनी व्यक्त केला.
हे लक्षात ठेवा…
नेमका कोणत्या कारणांमुळे ताण येतो हे समजून घ्या.
मित्र, समवयस्क कोणत्या पद्धतीने ताणतणावांचा सामना करतात, हे समजून घ्या.
पूर्वतयारी केली असेल तर त्यावर विश्वास ठेवा.
विचलित होऊ नका.
टोकाच्या परिणामांचा विचार करू नका.
व्यवस्थित झोप, आहार घ्या.
मोबाइल, सोशल मीडियापासून काही काळ दूर रहा.
नकारात्मक विचार, व्यक्ती, भीती ताणतणाव निर्माण करणाऱ्या घटकांपासून दूर राहा.
करिअरमध्ये असंख्य संधी व चांगले पर्याय उपलब्ध आहेत त्यामुळे घाबरून न जाता बिनधास्तपणे परीक्षेला सामोरे जा.
आयुष्यात करिअरच्या शेकडो संधी तुमची वाट पाहत आहेत, त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा.