• Sat. Sep 21st, 2024
मुलांसमोर उमेदवारांचे फोटो ठेवा अन्… खासदाराची निवड कशी करावी, विखेंनी सांगितला फॉम्युला

अहमदनगर : महायुती आणि आघाडीचे जागा वाटप आणि उमेदवारी निश्चिती अद्याप झाली नाही. तरीही अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून वर्षभरापूर्वापासून एकमेकांसमोर उभे ठाकलेले खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार नीलेश लंके यांच्यातील राजकीय संघर्ष अधिक टोकदार होताना दिसत आहे. खासदार होण्यासाठी कोण पात्र आहे? हे सांगण्याची जणू दोघांत स्पर्धा रंगली आहे. पारनेर तालुक्यातील एका कार्यक्रमात विखे पाटील यांनी निवडीचा असाच एक फॉम्युला लोकांना सांगितला. ‘तुमच्या मुला- मुलींसमोर या निवडणुकीतील सर्व उमेदवारांचे फोटो ठेवा आणि त्यांना विचारा, ‘तुम्हाला कोणासारखं व्हायचंय’! त्यांनी मी सोडून दुसऱ्या कोणाच्या फोटोला हात लावला तर खुशाला त्या उमेदवाराला मतदान करा,’ असे आव्हानच विखे पाटील यांनी दिले.या मतदारसंघात लंके विरूद्ध विखे पाटील ही लढत आता वैयक्तिक प्रतिमेवर येऊन ठेपली आहे. आपण सुरशिक्षत, सुसंस्कृत उमेदवार असल्याचा दावा विखे पाटील करतात. त्यांनी वैद्यकीय पदवी संपादन केली आहे. तर लंके यांनाही अलीकडेच एका स्वयंसेवी संस्थेने डॉक्टरेट प्रदान केली आहे. त्यावरूनही या दोघांत कलगितुरा रंगल्याचे पहायला मिळते.
Chandigarh Mayor:’आप’चे कुलदीप कुमार चंडीगडचे नवे महापौर; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, निवडणूक अधिकाऱ्यावर खटला
पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्‍वर येथे बचत गटांना साहित्याचे वाटप करण्याचा कार्यक्रम विखे पाटील यांच्या हस्ते झाला. त्यावेळीही त्यांनी या विषयावर भाष्य केले. विखे पाटील म्हणाले, मी डॉक्टरची पदवी अधिकृतपणे घेतली आहे, बोगस घेतलेली नाही. जनतेला काय हवे आणि काय नको, हे तपासूनच मी उपचार करतो आणि कामे मार्गी लावतो. चापलुसी करणार्‍यांपैकी तर मी नक्कीच नाही. लोकसभेत कोणाला पाठवायचे याचा निर्णय आता मतदारांना घ्यायचा आहे. तुम्हाला तुमचा खासदार हा वाळू तस्करांना व गुंडांना पोसणारा हवाय की त्यांचा बंदोबस्त करणारा? हे ठरवावे लागेल. ही निवड करण्यासाठी तुमच्या मुला- मुलींसमोर सर्व उमेदवारांचे फोटो ठेवा. त्यांना विचारा, ‘तुम्हाला कोणासारखं व्हायचंय’! जर त्यांनी मी सोडून कोणाच्याही फोटोला हात लावला तर आपण खुशाल त्याला मतदान करा, असेही विखे पाटील म्हणाले.

तालुक्यातील मतदारांबद्दल विखे पाटील म्हणाले, पारनेर तालुका पुरोगामी विचारांचा आणि संस्कृतीचा आहे. तालुक्यातील महिलांना सक्षम करण्याच्या अनुषंगाने आम्ही उचललेले पाऊल महिलांची आर्थिक उन्नती साधणारे आहे. चापलुसी करुन काहीही होत नाही. जनतेच्या मनात सारे काही आहे. जनतेनेच हिशेब करुन ठेवला आहे. त्यामुळेच मी कायम खासदार आहे, असा दावा मी कधीच करीत नाही. मात्र, भावी म्हणून घेणारे कधीच प्रत्यक्ष होत नाहीत, हेही मतदारांनी लक्षात ठेवावे, असेही विखे पाटील म्हणाले.

या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी सभापती काशिनाथ दाते, माजी जिल्हा परिषद सदस्य विश्‍वनाथ कोरडे, वसंतराव चेडे, भाजपा तालुकाध्यक्ष राहुल पाटील शिंदे, डॉ. भाऊसाहेब खिलारी, शिवसेना तालुका प्रमुख विकास रोहोकले, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बाबासाहेब खिलारी, माजी सभापती गणेश शेळके उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed