• Sat. Sep 21st, 2024

कंटेंट क्रिएटरला पोलिसांचा इंगा, माफी मागायला लावून त्याच्याच अकांऊंटवर VIDEO शेयर, काय घडलं?

कंटेंट क्रिएटरला पोलिसांचा इंगा, माफी मागायला लावून त्याच्याच अकांऊंटवर VIDEO शेयर, काय घडलं?

सौरभ बेंडाळे, नाशिक : सिनेमातील गुन्हेगारांची जीवनशैली बघून त्याचे अनुकरण करीत इन्स्टाग्रामवर गुन्हेगारी कृत्याला पाठींबा देणारे ‘रील्स’ अपलोड करणाऱ्या नाशिकमधील कथित ‘बकासुराला’ पोलिसांनी दणका दिला आहे. त्याला ताब्यात घेत माफी मागतानाचा व्हिडीओ तयार करून त्याच्याच अकाउंटवरून पोलिसांनी शेअर केला. त्यानंतर ‘नाशिकमधील इतरही ‘बकासुरां’वर आमची नजर आहे. त्यांनी वेळीच हे व्हिडीओ बंद करून अज्ञानतेचे बहाणे थांबवावेत’, असा सज्जड इशारा पोलिस आयुक्तालयाने दिला आहे.

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये, शहरातील सर्व सोशल मीडिया हॅण्डलवर सायबर व गुन्हे शोध पथकातील पोलिसांची नजर आहे. त्यानुसार एका सुजाण नागरिकाने दोन दिवसांपूर्वी एक व्हिडीओ पोलिसांना शेअर केला. त्यामध्ये ‘बकासूर साम्राज्य’ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून गुन्हेगारीला प्रोत्साहन देणाऱ्या रील्स संबंधित तरुण शेअर करीत होता. हा तरुण नाशिकमधील असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने संशयिताला ताब्यात घेतले. संशयिताची चांगलीच कानउघाडणी करून त्याच्यावर गंभीर गुन्हे नोंदविण्याचा इशाराही देण्यात आला. त्यानंतर परिणामांची जाणीव झाल्यावर संशयिताने पोलिसांची माफी मागितली. पोलिसांनी संबंधित इन्स्टाग्राम अकाउंटचा ताबा घेत काही व्हिडीओ हटविले आहेत. दरम्यान, शहरात या स्वरुपाचे व्हिडीओ तयार करणारे अनेकजण असल्याची माहिती पोलिसांकडे आहे. त्यानुसार गुन्हे शोध पथक संशयितांचा माग काढत आहे. त्या ‘बकासुरांनाही’ ताब्यात घेत कारवाई करणार असल्याचे आयुक्तालयाने सांगितले.

पॉइंटर्स…

– गुन्हेगारीला ‘ग्लोरीफाय’ करणाऱ्या रील्स; सर्वांना ताब्यात घेणार
– गुन्हेगारांना ‘फॉलो’ करणाऱ्यांवरही कारवाई
– शाळा-महाविद्यालयांच्या आवारात रील्स; धडक कारवाईचा इशारा
– संशयितांच्या पोस्टवरील कमेंट्सवरही पोलिसांची नजर

‘त्या’ यूजरलाही समज

इन्स्टाग्रामवर गुन्हेगारीचे रील्स बनविणाऱ्या ‘बकासुराने’ आतापर्यंत ५० पोस्ट केल्या होत्या. त्याला १ हजार ७६ फॉलोअर्स होते. पोलिसांची माफी मागून केलेल्या इतरांनाही व्हिडीओ थांबविण्याचे आवाहन संशयिताने केले. हा व्हिडीओ पाहण्यासाठी सोबतचा ‘क्यू-आर कोड’ स्कॅन करा. दरम्यान, काही दिवसांपूर्वी ‘एक्स’वरील एक यूजर पोलिस आयुक्तालयाच्या भूमिकेसह विविध कारवायांबाबत सातत्याने विरोधात पोस्ट अपलोड करीत होता. पोलिसांच्या दर्जेदार कामगिरीबाबतही त्याने शंका उपस्थित केली. त्यामुळे आयुक्तालयाने संबंधिताला बोलावून घेत कडक शब्दात समज दिली. तेव्हापासून त्याने पोलिसांविरोधातील पोस्ट टाकणे बंद केल्याचे दिसते.
गुन्हेगारीला प्रोत्साहन देणारे व्हिडीओ, संशयितांचे फॉलोअर्स या सर्वांची यादी तयार करण्यात येत आहे. संबंधितांना ताब्यात घेत कठोर कारवाई सुरू आहे. ‘झीरो टॉलरन्स’चे आदेश सर्व पथकांना दिले आहेत.- संदीप कर्णिक, पोलिस आयुक्त

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed