• Mon. Nov 18th, 2024
    आरोग्य विभागाला वर्धक मात्रा; ठाणे महापालिकेत मोठी भरती, २९४ पदांसाठी थेट मुलाखती

    म. टा. प्रतिनिधी, ठाणे : ठाणे महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील विविध पदांसाठी भरतीप्रक्रिया राबवण्यात येत आहे. तब्बल २९४ पदांसाठी थेट मुलाखती या भरती प्रक्रियेदरम्यान होणार असून स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग, भूलतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका यांसह विविध पदे कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत. या भरतीप्रक्रियेमुळे ठाणे पालिकेच्या आरोग्य यंत्रणेला वर्धक मात्रा मिळणार असून अपुऱ्या सोयीसुविधांमुळे पालिका रुग्णालयातील रुग्णांची गैरसोयही कमी होण्यास मदत होणार आहे.ठाणे पालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात एकाच रात्रीत १८ रुग्णांचे अचानक मृत्यू झाले. त्यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागातील त्रुटींबाबत विरोधकांकडून टीकेची झोड उठवण्यात आली. या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयाला भेट देऊन या गंभीर घटनेची समितीमार्फत सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते. यामध्ये चौकशी समितीच्या अहवालानंतर सहायक प्राध्यापक (असिस्टंट प्रोफेसर) व व्याख्याते (लेक्चरर) यांच्यावर कारवाई करण्यात आली. मात्र कळवा रुग्णालयातील यंत्रणेवर येणारा ताण लक्षात घेऊन २९४ पदांसाठी भरतीप्रक्रिया करण्याचा निर्णय ठाणे पालिका प्रशासनाने घेतला आहे. कंत्राटी पद्धतीने एकत्रित वेतनावर १७९ दिवसांच्या कालावधीसाठी भरती केली जाणार असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या भरती प्रक्रियेची ठाणे पालिका प्रशासनाने जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
    अजितदादांकडे उमेदवारी मागितली, भावना गवळींविरोधात दंड थोपटणाऱ्या मोहिनी नाईक कोण आहेत?

    ही पदे भरणार…

    स्त्रीरोग तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, फिजियोथेरपिस्ट, आरोग्य निरीक्षक, बालरोग तज्ञ, शल्य चिकिस्तक, डायटेशियन, बायोमेडिकल इंजिनीअर, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, स्पिच थेरिपिस्ट, पब्लिक हेल्थ नर्स, सायकॅट्रिक कौन्सिलर, वैद्यकीय समाजसेवक अधीक्षक, मानसोपचारतज्ज्ञ, सोशल वर्कर, दंत हायजिनिस्ट, इलेक्ट्रिशियन, ब्लड बँक टेक्निकल सुपरवायझर, डेप्युटी लायब्रेरियन, लायब्ररी असिस्टंट, क्युरेटर ऑफ म्युझियम, आर्टिस्ट, छायाचित्रकार, फिजिशियन, भूलतज्ज्ञ, नेत्र शल्य चिकित्सक, मेडिकल रेकॉर्ड कीपर, औषध निर्माण अधिकारी अशा पदांचा भरती प्रक्रियेत समावेश आहे.

    अशी आहे वयोमर्यादा

    या भरतीसाठी वयोमर्यादा निश्चित केली असून खुल्या गटासाठी ३८ वर्षे व मागासवर्गीय उमेदवारांसाठी ४३ वर्षे वयोमर्यादा राहणार आहे. शैक्षणिक अहर्ता व अनुभवाची पूर्तता करणारे उमेदवार मुलाखत फेरीसाठी पात्र होणार आहेत.

    १ मार्चपर्यंत भरतीप्रक्रिया

    येत्या २६ फेब्रुवारी ते १ मार्चपर्यंत भरती प्रक्रिया सुरू राहणार आहे. यामध्ये विविध पदांसाठी प्रत्येक दिवस मुलाखत फेरीसाठी नेमून दिला आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी पाचपाखाडी येथील ठाणे पालिका मुख्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर नमूद पदाच्या व संबंधित संवर्गासाठी दिलेल्या दिवशीच उपस्थित राहावे, असे आवाहन पालिका प्रशासनाच्या जाहिरातीद्वारे करण्यात आले आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed